वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा भार असह्य़ झाल्याने ठाणे महापालिकेने यापुढे नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर नागरी सुविधांचे ‘आउटसोर्सिग’ करण्याचा निर्णय घेतला आहे. जन्म-मृत्यू दाखला, वेगवेगळे परवाने, स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यास व्यापाऱ्यांची नोंदणी अशास्वरुपाच्या सुविधा महापालिका कर्मचाऱ्यांऐवजी बाह्य़यंत्रणेकडून खासगी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना दर्जेदार सुविधा पुरविण्यात कमी पडत असल्याचे लक्षात आल्याने महापालिकेने खासगीकरणाचा उतारा शोधून काढला आहे. अस्थापनेवर मोठय़ा प्रमाणावर रिक्त असलेली पदे भरण्याऐवजी या सुविधांचे खासगीकरण करुन कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांवर होणारा २५ टक्के खर्च वाचविण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच जकात आणि नागरी सुविधा केंद्रात सद्यस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मालमत्ता तसेच पाणीबिलाच्या वसुलीसाठी जुंपण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त आर.ए.राजीव यांनी शुक्रवारी येत्या वर्षांचा अर्थसंकल्प मांडताना ही नवी घोषणा केली. पायाभूत सुविधा प्रकल्पांनी खच्चून भरलेल्या या अर्थसंकल्पात ठाणेकरांवर कोणत्याही स्वरुपाची करवाढ लादण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पाच्या अखेरीस नागरी सुविधांच्या खासगीकरणाचे सुतोवाच करुन आयुक्तांनी प्रशासकीय क्षमता वाढविण्यासाठी कायमस्वरुपी कर्मचारी नेमले जाणार नाहीत हे स्पष्ट केले.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नागरी सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले असून या केंद्रात नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे परवाने तसेच दाखले दिले जातात. महापालिकेच्या अस्थापनेवर मोठय़ा प्रमाणावर पदे रिक्त असून शासनाकडे नव्या पदनिर्मीतीचे प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर तसेच वसूलीवर परिणाम होत आहे. तसेच नागरिकांना परवाने मिळवताना काही वेळा अडचणींना सामोरे जावे लागते.
या पाश्र्वभूमीवर कायमस्वरुपी कर्मचारी नेमण्याऐवजी दैनंदिन कामकाजासाठी बाह्य़यंत्रणेचा (आउटसोर्सिग) वापर केला जाणार आहे. येत्या एक मेपासून जकातीऐवजी स्थानिक संस्था करप्रणाली (एलबीटी) लागू करण्याचा निर्णय जवळपास पक्का झाला असून यासाठी व्यापाऱ्यांची नोंदणीही खासगी कर्मचाऱ्यांकडून केली जाणार आहे. याशिवाय संगणक प्रणालीचे परिचालन, लेखांकन, बॅंक ताळमेळ यासारख्या कामांवरुन महापालिका कर्मचाऱ्यांना बाजूला करुन त्यांच्याकडे इतर कामे सोपवली जाणार आहेत.
नाटकाची ऑनलाईन
तिकीट विक्री
गडकरी रंगायतन तसेच डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहातील नाटकाच्या तिकीटांची नोंदणी यापुढे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. मराठी नाटकांना पुरेसा प्रेक्षक उपलब्ध नाही, अशी ओरड सर्वत्र होत असताना ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील नाटकाच्या प्रयोगांना रसिकांची चांगली उपस्थिती असते, असे दिसून आले आहे. त्यामुळे रसिकांना अधिकाधिक सुविधा कशा पुरविता येतील यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरु केले असून ऑनलाईन बुकीग हा याच प्रयत्नांचा भाग आहे, अशी माहिती नाटय़गृहाचे व्यवस्थापक महेश राजदेरकर यांनी दिली.