दिवसभरात एसटीच्या सातच फेऱ्या; संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु

सातव्या वेतन आयोगाची मागणी करत एसटीच्या मान्यताप्राप्त कामगार संघटनेसह अन्य पाच संघटनांनी मंगळवारपासून पुकारलेला बेमुदत संप दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. संपाच्या पहिल्या दिवशी खासगी बस चालवून थोडाफार दिलासा प्रवाशांना मिळालेला असतानाच दुसऱ्या दिवशी मात्र एकही खासगी बस धावू शकली नाही. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. महत्त्वाची बाब म्हणजे संपाबाबत एक महिना आधी संघटनांकडून नोटीस देण्यात आल्यानंतरही एसटी प्रशासनाकडून संपावर वेळीच तोडगा का काढण्यात आला नाही, असा सवालही उपस्थित झाला आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबई सेन्ट्रल येथील मुख्यालयात रात्री उशिरापर्यंत बैठकही सुरू होती.

सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातव्या वेतन आयोगाची मागणी एसटीच्या मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेसह अन्य पाच संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी गेल्या दीड वर्षांपासून वेतन करारही करण्यात आलेला नाही. एकंदरीतच वेतनवाढीचा मुद्दा गेल्या दीड वर्षांत सुटू शकला नाही. त्यामुळे एसटीच्या संघटनेकडून १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला.

दिवसभरात एक टक्का भारमानही एसटीला दुसऱ्या दिवशी मिळू शकले नाही. त्यामुळे एसटीची सेवा पूर्णपणे कोलमडली. सकाळपासून प्रवाशांचे होणारे हाल आणि एसटी महामंडळाच्या धोरणांविरोधातही व्यक्त होणारा रोष पाहता महामंडळाने एसटी संघटनांना दुपारी चर्चेसाठी बोलावले.

एसटी अधिकाऱ्यांसोबत दुपारी झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघू शकला नाही. अखेर संध्याकाळी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत संघटनांची बैठक झाली. मात्र रात्री उशिरापर्यंत तोडगा काढण्याचे काम सुरू होते.

ग्रामीण भागाला फटका

संपाच्या पहिल्या दिवशी ५८ हजार बस फेऱ्यांपैकी अवघ्या ६८१ फेऱ्याच होऊ शकल्या आणि त्यामुळे २२ कोटी रुपयांचे उत्पन्नही बुडाले. किमान दुसऱ्या दिवशी तरी संपावर एसटी महामंडळाकडून तोडगा काढून प्रवाशांना दिलासा देण्यात येईल, असे वाटत असतानाच त्यात महामंडळाला अपयशच आले. बुधवारीही संपाची झळ ही प्रवाशांना बसली आणि बस उपलब्धच न झाल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवासी हे एसटीचे आगार आणि स्थानकात बसची वाट पाहात होते. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील तालुका, ग्रामीण भागातील प्रवासावर झालेला परिणाम मोठा होता.

आगारांची स्थिती

एसटीच्या दिवसभरात ५८ हजार बसफेऱ्या होतात. मात्र अवघ्या सातच फेऱ्या होऊ शकल्या. यात सोलापूरमध्ये चार, मालेगाव, पेण आणि ठाण्यातून प्रत्येकी एक फेरी चालवण्यात आली. अनेक आगारांत शुकशुकाट होता. तर काही आगारांत एसटी कर्मचाऱ्यांकडून निर्दशने केली जात होती. यावर एसटी प्रशासनाकडून बारकाईने लक्ष दिले जात होते. तर आगार आणि स्थानकात पोलिसांचा पाहाराही होता.