दादर स्थानकात गुरूवारी संध्याकाळी लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. दादरच्या फलाट क्रमांक १ आणि २ वर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला होता. रात्री ७.५५ च्या सुमारास दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर बदलापूरला जाणारी धीमी लोकल आली. मात्र त्याचवेळी झाडाची फांदी ओव्हारहेड वायरवर पडल्याने स्पार्किंग होऊन ठिणग्या उडाल्या. यामध्ये बदलापूर लोकलचा पेंटाग्राफही तुटला आहे. त्यामुळे सध्या फलाट क्रमांक १ व २ वरील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे सीएसटीहून ठाण्याच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या जलद मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक दादर येथे जलद मार्गावरून वळवण्यात आली आहे. मात्र, आता सर्व प्रवाशांनी जलद ट्रेनसाठी गर्दी करायला सुरूवात केल्याने या मार्गावरील ताण वाढण्याची शक्यता आहे.

कार्यालये सुटल्यामुळे अनेक चाकरमनी घरी जाण्यासाठी परत निघाले आहेत. मात्र, या खोळंब्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वीज नसल्यामुळे फलाट क्रमांक १ व २ वरील वाहतूक सध्या पूर्णपणे ठप्प आहे. दोन्ही फलाटांवर पूर्णपणे अंधार पसरला आहे. रेल्वेचे अनेक अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आणि त्यानंतर दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. दरम्यान, ८.२० च्या सुमारास हा बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. त्यानंतर पेंटाग्राफ तुटलेली लोकल बदलापूरच्या दिशेने रवाना झाली. मात्र दरम्यानच्या काळात धीम्या मार्गावरील वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.