‘पॉपसिकल्स’ म्हणजेच फ्लेवर्ड किंवा कॅण्डी आइस्क्रीम. आपल्याकडे कॅण्डी म्हणजे लहानग्यांची मक्तेदारी असा सर्वसाधारण समज आहे. त्यामुळे एखादी मोठी व्यक्ती हातातल्या कॅण्डीवर मिटक्या मारत ताव मारताना दिसली तर लहान झालास किंवा झालीस का, असा टोला सहज हाणला जातो. ‘पॉपसिकल्स’ या संकल्पनेला परदेशात जितके  वलय आहे, त्यामध्ये जितके प्रयोग केले जातात तितके प्रयोग भारतात झालेले दिसत नाहीत. त्यातही क्रिमी पॉपसिकल्स सगळीकडेच मिळतात, पण फ्रुटी पॉपसिकल्स मिळणे कठीणच. दिल्लीत फ्रुगरपॉप नावाचा फूड ट्रक आहे, त्यांच्याकडे हा प्रकार मिळत असला तरी मायानगरी मुंबईत हा प्रकार आजवर कुठेच मिळत नव्हता; पण चिंतेचं कारण नाही, कारण एका क्लिकवर किंवा फोनवर आता मुंबईच्या कुठल्याही भागात हे पॉपसिकल्स तुम्हाला चाखायला मिळणार आहेत. पॅलेटेरिआ यांनी दिसायला आकर्षक, चविष्ट आणि आरोग्याला चांगले असे फ्रुटी पॉपसिकल्स बाजारात आणले आहेत. मल्लिका सावला-जडेजा या नवउद्यमी तरुणीने मुंबईकरांना कूल ठेवण्याचा विडा उचललेला आहे. मल्लिकाने आपली लहान बहीण मेलानी आणि दोन मित्रांच्या साथीने वर्षभरापूर्वी पॅलेटेरिआ या ब्रॅन्डची सुरुवात केली. आज वर्षभरानंतर गोड पदार्थ असला तरी आरोग्यासाठी चांगला ठरेल असा वेगळा पदार्थ आणि मागणीनुसार केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगांमुळे पॅलेटेरिआचे पॉपसिकल्स लोकप्रिय होताना दिसत आहेत.

पॅलेटेरिआमध्ये स्ट्रॉबेरी किवी, पॉमबेरी, फ्रुटीलिशियस म्हणजेच मिक्स फ्रूट, ग्रीन अँपल आणि िमट, मँगो स्ट्रॉबेरी, ट्रिपल बेरीस, वॉटरमेलन कूलर हे ताज्या फळांचे पॉपसिकल्स मिळतात, तर रासबेरी/ब्लूबेरी चीझ केक, नटेला क्रीम, की लाइम, बेरी योगट ब्लास्ट, पीनट बटर क्रन्च, कोकनट डिलाइट, ओरिओ कूकीज आणि क्रीम हे क्रीमी पॉपसिकल्स आहेत. त्याशिवाय चाय लाटे आणि तिरामिसू अतिशय वेगळ्या फ्लेवर्सचे टी आणि कॉफी पॉपसिकल्सही आहेत. मेन्यूमध्ये नमूद केलेल्या सर्व पॉपसिकल्सशिवाय मल्लिका दर महिन्याला नवनवीन प्रयोग करत असते. हंगाम, सण आणि ग्राहकांच्या मागणीनुसार हे प्रयोग केले जातात. उदा. अलीकडेच होळीसाठी रंगीबेरंगी पॉपसिकल्स तयार करण्यात आली होती. यातील रंगांसाठी फळं आणि भाज्यांचा वापर करण्यात आला होता. हिरव्या रंगासाठी पालक, गुलाबी रंगासाठी बीट, लाल रंगासाठी स्ट्रॉबेरी, जांभळ्या रंगासाठी काळी द्राक्षे वापरली गेली होती.

पॉपसिकल्स तयार करताना प्रत्येक फळाला त्याची चव, रंग आणि प्रकारानुसार वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. तसंच दोन किंवा अधिक फळांचे पॉपसिकल तयार करताना प्रत्येक फळाची चव, रंग टिकून राहील याची विशेष काळजी घेतली जाते. पॉपसिकलचा मोल्ड लहान असल्याने हाताने त्यात फळांचे तुकडे भरण्यापासून ते सेट होईपर्यंत खूपच संयमाने सर्व प्रक्रिया केली जाते, कारण एकदा ते तयार झाले की चवीसोबतच दिसायलाही आकर्षक असणं तितकंच गरजेचं असतं. पॉपसिकल्स सेट करण्यात वेळ जात असला तरी फ्रीिझग करण्यासाठी मशीन असल्याने या सर्व प्रक्रियेला थोडा वेग आलेला आहे. पूर्वी फ्रीजिंगसाठी जिथे सहा ते आठ तास लागायचे तेच काम आता तासाभरात होतं. असं असलं तरी येथे फक्त ऑर्डरनुसारच पॉपसिकल्स बनवली जातात, कारण ते बनवण्यापासून खाण्यापर्यंतच्या काळात फळांचा ताजेपणा टिकवून ठेवण्याकडे त्यांचा सर्वाधिक भर आहे. त्यामुळे तुम्हाला पॅलेटेरिआचे पॉपसिकल्स खायचे असतील तर चोवीस तास आधी ऑर्डर देणं गरजेचं आहे. पॉपसिकल्स खाण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही, कारण ते कुठल्याही दुकानात मिळत नाहीत. त्याची फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि फोनवरच ऑर्डर घेतली जाते. विरारपासून चर्चगेट, सीएसटीपासून कल्याण, नवी मुंबई अशा कोणत्याही भागातून तुम्ही हे घरी ऑर्डर करू शकता; पण कमीत कमी सहा पॉपसिकल्सची ऑर्डर तुम्हाला द्यावी लागेल आणि डिलिव्हरीसाठी दीडशे रुपये आकारले जातात. वीस पॉपसिकल्सपेक्षा जास्त ऑर्डर असेल तर मात्र मोफत डिलिव्हरी केली जाते. दिसायला आकर्षक आणि आरोग्यदायी अशा या एका पॉपसिक्लसची किंमत शंभर रुपये असली तरी त्याच्या एकूणच अवताराला ती योग्यच म्हणावी लागेल. आकर्षक लेबल असलेल्या प्लास्टिकच्या आवरणातील ही पॉपसिकल्स चांगल्या थर्माकॉलच्या खोक्यात ड्राय आइसचा तुकडा ठेवून डिलिव्हर केली जातात. त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ही पॉपसिक्लस कडक आणि थंडगार राहतात. साधारण सहा ते आठ तास ती या बॉक्समध्ये तशाच स्थितीत राहू शकतात. तुमच्या हातात पडल्यावर तुम्ही ती फ्रीजरमध्ये ठेवून पाहिजे तेव्हा खाऊ शकता. घरगुती ऑर्डरसोबतच वाढदिवस, पार्टी, लग्न समारंभ यांच्या ऑर्डर्सही तुम्ही येथे देऊ शकता आणि तेव्हा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पॉपसिकल्स बनवून घेऊ शकता.

पॅलेटेरिआ

पॉपसिकल्स ऑर्डर करण्यासाठी ९७०२९५२३००/ ९९६७०४६१८६ या क्रमांकांवर किंवा paleteriaindia@gmail.com येथे संपर्क साधावा.