‘इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया’चे अध्यक्ष नीलेश विकमशी यांची कन्या पल्लवी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. तिच्या तणावाचे कारण वैयक्तिक होते, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. पल्लवीने याच कारणातून आत्महत्या केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली.

पोलिसांनी शनिवारी विकमशी कुटुंबासह पल्लवीच्या मित्रपरिवाराचे जबाब नोंदवले. या जबाबांमधून पल्लवी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून तणावात होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी सहप्रवासी गीता गायकवाड, करीरोड रेल्वे स्थानकाचे प्रबंधक मीना, त्यांचा मदतनीस सचिन तळेकर या तिघांचे जबाब शनिवारी नोंदवले.

गीता महापालिका कर्मचारी आहेत. बुधवारी त्यांनी भायखळा येथून डोंबिवली लोकल पकडली.  या डब्याला लागूनच असलेल्या प्रथम श्रेणी डब्यातून पल्लवी प्रवास करीत होती.  लोकलने चिंचपोकळी सोडल्यानंतर पल्लवी सारखी बाहेर वाकू लागली होती. लोकलने करीरोड स्थानक सोडले आणि लगेचच प्रथम श्रेणी डब्यातून किंचाळी ऐकू आली. पल्लवीच्या शेजारी उभी असलेली अन्य प्रवासी तरुणी रडत होती. पाहिले तेव्हा पल्लवी दारात नव्हती. ती चालत्या लोकलमधून खाली पडली होती, असे गीता यांनी आपल्या जबाबात सांगितले आहे. मात्र पल्लवी पडताना पाहिलेले नाही. त्यामुळे तोल जाऊन खाली पडली, की तिने उडी मारली हे स्पष्ट सांगता येणार नाही, असे गीता यांनी सांगितल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक नितीन बोबडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

करीरोड स्टेशन मास्टर मीना आणि त्यांचा मदतनीस तळेकर यांनी आपल्या जबाबात अपघाताचा संदेश मिळताच घटनास्थळी जाऊन गंभीररीत्या जखमी झालेल्या महिलेला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. मृतदेहाजवळ महिलेची पर्स किंवा मोबाइल सापडला नाही, असे सांगितले.

पल्लवीने बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून लोकल पकडली तेव्हा ती मोबाइलवर बोलत होती. मृत्यूच्या काहीच मिनिटांआधी तिने आपल्या वहिनीला ‘नो वन इज रिस्पॉन्सिबल’ असा लघुसंदेश धाडला होता. त्यानंतर मोबाइल बंद झाला. तिच्या मोबाइलचे अखेरचे लोकेशन करीरोड स्थानकाच्या जवळपासचे आहे. मग मोबाइल गेला कुठे असा प्रश्न निर्माण झाला असून पोलीस मोबाइलचा शोध घेत आहेत.