सध्या केवळ आपल्या नेटवर्कच्या वर्तुळामध्ये शक्य असलेली मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची सेवा ३ मेपासून संपूर्ण देशात उपलब्ध होणार आहे. म्हणजे मुंबईतील मोबाइल क्रमांक दिल्लीत जाऊन तेथील स्थानिक मोबाइल नेटवर्क कंपनीत पोर्टिग करणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय नंबर पोर्टेबिलिटी संदर्भात ‘टेलिकॉम नियामन प्राधिकरण’ (ट्राय)ने बुधवारी एक परिपत्रक जाहीर करून ही माहिती दिली.
नंबर पोर्टेबिलिटी सुरू करून ‘ट्राय’ने करोडो मोबाइल ग्राहकांना दिलासा दिला. यामुळे ग्राहकांना त्यांना पसंत पडणारी मोबाइल नेटवर्क सुविधा कंपनी निवडणे शक्य झाले. पूर्वी ही सेवा केवळ मोबाइल नेटवर्क वर्तुळापुरतीच मर्यादित होती. पण काही राज्यांमध्ये एकच नेटवर्क वर्तुळ असल्यामुळे तेथील ग्राहकांना संपूर्ण राज्यासाठी या सुविधेचा वापर करता येत होता. पण आता ही सेवा राष्ट्रीय पातळीवर सुरू होणार आहे. यासाठी जानेवारी महिन्यात ट्रायने एक मसुदा तयार करून तो सरकारकडे सादर केला होता. या मसुद्यावर ६ फेब्रुवारीपर्यंत सूचनाही मागविण्यात आल्या होत्या. या सूचनांचा विचार करून बुधवारी ट्रायने अंतिम परिपत्रक प्रसिद्ध करून त्यामध्ये ३ मेपासून ही सुविधा देशभर सुरू करण्याचे जाहीर केले. याचबरोबर ग्राहकाने एकदा नंबर पोर्टेबिलिटी केल्यानंतर पुन्हा पोर्टेबिलिटी करण्यासठी ९० दिवस वाट पाहावी लागत होती. हा कालावधी आता ६० दिवसांवर आणण्यात आला आहे.