पंढरपूरचा विठोबा-रखमाई हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून आगामी एक महिन्यात पंढरपूरच्या विकासाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. पंढरपूरच्या दहा किलोमीटर परिसराच्या विकासासाठी ६४७ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून त्याच्या छाननीनंतर कालबद्ध विकास केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी विकास प्राधिकरणाची घोषणा केली असली तरी अनेक कामे आज अपूर्णावस्थेत आहेत. चंद्रभागेच्या वाळवंटात न्यायालयाच्या आदेशामुळे वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देता येत नाहीत. वारीच्या वाटेवर स्वच्छतागृहांच्या निर्मितीसह शहरातील रस्त्यांसह अनेक प्रकल्पांची कामे प्रलंबित असल्याची टीका करीत याप्रकरणी तात्काळ कारवाई करा अशी मागणी आमदार भारत भालके, दिलीप सोपल आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली. स्मशानभूमीतील अस्थी नदीत विसर्जित करण्यात येत असल्यामुळे तसेच ड्रेनेज व गटाराचे पाणीही मोठय़ा प्रमाणात नदीत जात असल्यामुळे नदी प्रदुषित होत असून तेच पाणी भाविक तीर्थ म्हणून पीत असल्यामुळे जलजन्य आजार होत असल्याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले.
उत्तरादाखल मुख्यमंत्री म्हणाले, पंढरपूर क्षेत्राचा विकास हा पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखी तळ मार्ग विकास आराखडा आणि पंढरपूर विकास प्राधिकरण या तीन योजनांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
६४७ कोटींचा आराखडा
 प्राधिकरणाच्या कामासाठी पंढरपूर येथे कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले असून पंढरपूरच्या दहा किलोमीटर परिसराच्या विकासासाठी ६४७ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यापूर्वीच्या एकूण तीस कामांपैकी अकरा कामे पूर्ण झाली असून एकोणीस कामांपैकी दहा कामे २०१६ पूर्वी पूर्ण केली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रभागेच्या वाळवंटात मंडप व शौचविधीस बंदी असली तरी सोलापूरचे पालकमंत्री व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.