ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. डी. के. दातार हे वयाची ८० वर्षे पूर्ण करीत असल्याबद्दल ‘सुरेल ८०’ या पं. डी. के. दातार गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पं. हरिप्रसाद चौरसिया आणि महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते पं. दातार यांचा गौरव करण्यात येणार असून हा कार्यक्रम रविवारी स्वा. सावरकर स्मारक, शिवाजी पार्क येथे सायंकाळी ६ वा़ आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ गायिका देवकी पंडित यांचे शास्त्रीय गायन आणि गौरव सोहळा – सीडी प्रकाशन असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून तो सर्वासाठी खुला आहे. पं. दातार यांची वादनशैली गायकी अंगाची म्हणजे गायनाशी नातं आणि इमान राखणारी आहे. दातार यांनी निघ्नेश्वर शास्त्री पंडितांकडे व्हायोलिन वादनाचे धडे गिरविले. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे पुत्र डी. व्ही. पलुस्कर यांचा सहवास पं. दातार यांना लाभला. त्यांनी डी. व्ही. पलुस्कर यांना अनेक कार्यक्रमांमधून संगतही केली. पं. दातार यांना पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमीचा सन्मानही मिळाला आहे. संगीत रिसर्च अकादमी आणि कुमार गंधर्व फाऊण्डेशन यांनीही पं. दातार यांचा गौरव केला आहे.