नियम डावलून २०६ कोटी रुपयांची खरेदी केल्यावरून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विरोधकांकडून लावण्यात आलेले गैरव्यवहाराचे सर्व आरोप त्यांनी बुधवारी फेटाळले. या प्रकरणी कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असून, एकही रुपयांचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्यास सर्व पदांचा राजीनामा देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. केवळ राजकीय आकसापोटी आपल्यावर गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले असून, हा केवळ शब्दांचा घोटाळा असल्याचा खुलासा त्यांनी केला.

ई-टेंडरिग डावलून पंकजा मुंडे यांनी २०६ कोटी रुपयांची खरेदी केल्याचा आणि काही ठरावीक पुरवठादारांच्या हिताचा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यावर खुलासा करताना मुंडे म्हणाल्या, ज्यावेळी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते, त्यावेळीच ई-टेंडरिंग करायचा राज्य सरकारचा निर्णय आहे. आम्ही केलेल्या खरेदीमध्ये दरकरार निश्चित झाले होते. त्याचबरोबर गेल्या आघाडी सरकारच्या काळात सुमारे ४०८ कोटींची खरेदी याच पद्धतीने करण्यात आली होती. जर कॉंग्रेसकडून २०६ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप माझ्यावर करण्यात येतो आहे. तर आघाडी सरकारच्या काळात ४०८ कोटींचा घोटाळा झाला होता, असे मी म्हणू शकते. चिक्की आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी मी कोणत्याही नवीन पुरवठादाराला या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले नाही. गेल्या सरकारच्या काळात ज्या पुरवठादारांकडून दरकरारानुसार खरेदी करण्याचा निर्णय झाला होता. त्यांच्याकडूनच ही खरेदी करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून आलेला निधी वाया जाऊ नये, एवढीच या खरेदी मागची आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
तीन लाख रुपयांपेक्षा जास्तीची खरेदी ई-टेंडरिंगने करायचा निर्णय एप्रिलमध्ये घेण्यात आला होता. मात्र, माझ्या विभागाने केलेली खरेदी ही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये केली असल्याकडे लक्ष वेधून त्या म्हणाल्या, बाजारभावापेक्षा जास्त दराने वस्तूंची खरेदी केल्याचा आरोपही चुकीचा आहे. आमच्या विभागाने बाजारभावापेक्षा कमी दराने खरेदी केली आहे. त्याचबरोबर अंगणवाडीतील मुलांसाठी पोषण आहाराच्या माध्यमातून देण्यात आलेल्या चिक्कीचा दर्जा आम्ही दोन प्रयोगशाळांमधून तपासला. या चिक्कीचा दर्जा व्यवस्थित असल्याचेही त्यांनी सांगितले.
केवळ ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याकडेच चौकशी करू नका, ज्यांनी आरोप केले त्यांची विश्वासार्हतादेखील तपासा, असाही टोला त्यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला.