मुख्यमंत्रीपद नाकारल्यावर पक्षनेतृत्वाला आव्हान देणाऱ्या नारायण राणे यांना त्याचे प्रायश्चित भोगावे लागले. खाते बदलल्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जाळण्यापर्यंत मजल गेलेल्या पंकजा मुंडे यांनाही भाजपचे नेतृत्व भविष्यात इंगा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असाच पक्षात सूर आहे.

विलासराव देशमुख यांच्या जागी अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर संतप्त झालेल्या नारायण राणे यांनी काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला होता. राहुल गांधी, अहमद पटेल या नेत्यांवर आरोप केले होते. राणे यांना त्याची तेव्हा किंमत मोजावी लागली. काँग्रेसच्या तुलनेत भाजपमध्ये पक्षशिस्तीला अधिक महत्त्व दिले जाते. जलसंधारण खाते काढून घेतल्याने पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जाळली. यामुळे पक्षशिस्तीलाही तडा गेला आहे.