परळ आणि पनवेल टर्मिनसच्या कामास प्रारंभ; लाखो प्रवाशांना दिलासा 

रेल्वेच्या वाढत्या प्रवासी संख्येचा आणि विस्ताराचा विचार करता अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या परळ आणि पनवेल टर्मिनसच्या कामाचा शुभारंभ अखेर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. यामुळे येत्या तीन वर्षांत उपनगरीय लाखो प्रवाशांसह लांब पल्ल्यांच्या प्रवाशांना तसेच नवी मुंबई भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परळ टर्मिनससाठी  ५१ कोटी तर पनवेल टर्मिनससाठी १५४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून सिडको आणि रेल्वे हा खर्च संयुक्तरीत्या करणार आहे.

गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात महानगरांच्या आसपास नवीन टर्मिनस विकसित करून तेथून लांब पल्ल्याच्या गाडय़ा सोडण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. त्यानंतर शहराची वाढती गरज लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वे यांनी अशा तीन टर्मिनसचा प्रस्ताव रेल्वेकडे पाठवला होता. यात पनवेल, ठाकुर्ली आणि वसई या स्थानकांचा समावेश होता. यात परळसह, २०१२-१३ साली मंजूर झालेल्या पनवेल टर्मिनसचे काम तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या दोन्ही टर्मिनसच्या कामाला सोमवारी सुरुवात झाली. त्यामुळे येत्या काळात मुंबईतील उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीवर पडणारा ताण मोठय़ा प्रमाणात कमी होणार असल्याचा दावा मध्य रेल्वेचे अधिकारी व्यक्त करत आहेत. मुंबईत सध्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ही टर्मिनस आहेत. त्यात या दोन टर्मिनसची भर पडल्यास मुंबईकरांचा मोठा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. यात परळ टर्मिनसमुळे मध्य रेल्वेवरील दादर स्थानकातील गर्दी आणि परळ स्थानकावरील भार कमी होईल, तर पनवेल टर्मिनसमुळे मुंबईबाहेरून येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांना छत्रपती शिवाजी टर्मिनल किंवा लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत न आणता पनवेल टर्मिनसला थांबवता येणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा वेळही वाचणार असून उपनगरीय रेल्वे गाडीच्या फेऱ्या वाढवण्यासाठी जागा मिळणार आहे. दरम्यान, पनवेल टर्मिनसचे काम सुरू झाल्यानंतर पनवेललगतच्या परिसरातील घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

परळ टर्मिनससाठी काय?

नवीन फलाटांच्या निर्मिती, फलाटांची रुंदी १० मीटर वाढवणार, परळ स्थानकाच्या मध्यावर नवीन पादचारी पूल उभारणार, दक्षिण दिशेचा पादचारी पूल एल्फिन्स्टन रोडच्या रस्ते पुलाशी जोडणार. प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला आणखी एक प्लॅटफॉर्म बांधून त्या मार्गावर परळ लोकल येण्याची व्यवस्था. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या गाडय़ा एल्फिन्स्टन रोडच्या बाजूला टाकण्यात येणारया नव्या माíगकेवरून जातील. सध्या अस्तित्त्वात असलेला दादरच्या दिशेकडील पादचारी पूल पश्चिम दिशेला उतरवणार. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने नव्याने बांधण्यात येणाऱ्या नवीन उन्नत पादचारी पुलावर नवीन तिकीट घर सुरू करणार, छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने येणारा स्कायवॉक कॅरॉल पुलाशी जोडणार, यार्डाची रचना आधुनिक होणार.

पनवेल टर्मिनस कसे असेल?

रेल्वेचे तीन फलाट, पादचारी पूल तसेच रस्ते मार्गाना जोडणारा भुयारी मार्ग, पनवेल ते कळंबोली येथे लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोचिंग टर्मिनस उभारणी, लांब पल्ल्यांच्या गाडय़ांची धुलाईसाठी ४ नव्या मार्गिका, तसेच गाडय़ा उभ्या करण्यासाठी स्वतंत्र दोन मार्गिका.

  • पनवेल टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यानंतर अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ांना नवी मुंबई येथे थांबा देता येणार आहे.
  • त्यामुळे नवी मुंबईहून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस येथे गाडीत बसायला येणाऱ्या प्रवाशांना पनवेलहून गाडी पकडता येणार आहे.
  • तसेच पनवेल टर्मिनसहून नव्या गाडय़ा चालवल्या जाऊ शकतात. याशिवाय उपनगरीय मार्गांवरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल.