ठाणे-डोंबिवलीदरम्यान जलद गाडय़ांची कूर्मगतीने मार्गक्रमणा
ऐन दुपारी बाराच्या वेळी डोंबिवली स्थानकात फलाट क्रमांक पाचवर उभ्या असलेल्या तमाम जनतेच्या डोळ्यांसमोर इंडिकेटरवरील ११.५०ची मुंबईला येणारी जलद गाडी झळकत असते.. लोक त्या गाडीच्या आशेने घाम पुसत हाश्शहुश्श करत फलाटवरच थांबलेले असतात.. एवढय़ाच एकामागोमाग एक अशा दोन-तीन लांब पल्ल्याच्या गाडय़ा धडधडत जातात.. त्यानंतर १५ ते २० मिनिटांच्या उशिरानंतर जलद गाडी एकदाची प्रचंड भरून येते.. त्यात कशीबशी जागा मिळते आणि गाडी दिव्यापर्यंत मस्त येऊन दिव्यापुढे कासवाच्या गतीने चालायला सुरुवात होते.. काही महिन्यांपूर्वी डोंबिवलीहून १५ मिनिटांत ठाणे गाठणाऱ्या या जलद गाडीला सध्या २५ ते ३० मिनिटांचा अवधी लागतो..
हा प्रकार मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या वाटेला दर दिवशी येत आहे. वेळ कोणतीही असो, नेहमीच दिरंगाईने धावणाऱ्या गाडय़ा, ठाणे ते डोंबिवलीयांदरम्यान अत्यंत कूर्मगतीने रांगणाऱ्या जलद गाडय़ा यांमुळे मध्य रेल्वेचे प्रवासी हवालदिल झाले आहेत. संध्याकाळच्या वेळी ठाण्याहून सुटलेली जलद गाडीही पारसिक बोगद्याजवळ रेंगाळते, बोगद्यातून ताशी १० ते १५ किमी एवढय़ा कमी वेगाने जाते आणि त्यामुळे आत गर्दीत घुसमटणाऱ्या प्रवाशांच्या नाकी नऊ येतात.
मध्य रेल्वेवर झालेल्या डीसी-एसी परिवर्तनाचा परिणाम म्हणून पारसिक बोगद्यात वेगमर्यादा लावण्यात आली होती. मात्र त्यातच पारसिक बोगद्याला गळती लागल्यामुळे मध्य रेल्वेने या बोगद्याच्या दुरुस्तीचे काम काढले आहे. या कामामुळे सध्या बोगद्यातील वेगमर्यादा अजूनच कठोर करण्यात आली आहे. तसेच बोगद्याआधीही गाडय़ा थांबवल्या जात असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात.
रेल्वे अधिकाऱ्यांची ही कारणे नेहमीची असून त्यामुळे प्रवाशांना होणारा मनस्ताप कमी होणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत आहेत. रेल्वेने वेळापत्रक बनवताना मेल-एक्स्प्रेस गाडय़ांची वाहतूक, वेगमर्यादा यांचा विचार नक्कीच केला असेल. तरीही महिन्यातील एकही दिवस मध्य रेल्वेच्या गाडय़ा वेळापत्रकाप्रमाणे धावत नाहीत. मासिक-त्रमासिक पासच्या आणि तिकिटांच्या माध्यमातून प्रवाशांकडून आगाऊ पैसे घेणारी मध्य रेल्वे गाडय़ा उशिराने चालवून प्रवाशांची फसवणूक करत असल्याचा आरोप उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाच्या नंदकुमार देशमुख यांनी केला.
याबाबत रेल्वेवर फसवणुकीचा गुन्हा टाकता येईल का, याचीही चाचपणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. बदलापूर, आसनगाव या ठिकाणी उत्तम बंगले बांधून तेथे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवास व्यवस्था द्यावी. जेणेकरून दक्षिण मुंबईत कामाला येण्यासाठी या अधिकाऱ्यांनाही सामान्य प्रवाशांप्रमाणेच प्रवास करावा लागेल. त्यानंतरच या अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या मनस्तापाची आणि हालाची कल्पना येईल, अशी प्रतिक्रिया संघटनेच्या महिला प्रतिनिधी लता अरगडे यांनी नोंदवली.