पाच उच्चशिक्षित तरुण गजाआड, ७० लाखांचे एलएसडी पेपर हस्तगत

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यातील तरुणाईला एलएसडी हा पार्टी ड्रग्ज पुरवणारी टोळी गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने उद्ध्वस्त केली. या टोळीतील पाच तरुणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे ७० लाख रुपये किमतीचे एलएसडी पेपर हस्तगत करण्यात आले. धक्कादायक बाब ही की अटक आरोपी २० ते २६ वर्षे वयोगटातील असून उच्चशिक्षित आहेत. मुंबईतील बहुतांश डिस्को, पब आणि श्रीमंत महाविद्यालयांमधील तरुणाईला ही टोळी अमली पदार्थ पुरवत होती.

प्राथमिक चौकशीत मुंबई, पुण्यात चोरीछुपे घडणाऱ्या रेव्ह पाटर्य़ामध्ये या टोळीला खास करून आमंत्रणे सुटत. अशा पाटर्य़ामध्ये ही टोळी एलएसडी या अमली पदार्थाची विक्री करते, अशी माहिती समोर आल्याचे समजते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बॉलीवूड, मालिकांसाठी काम करणाऱ्यांपैकी काही या टोळीचे नियमित ग्राहक असू शकतात, असा दाट संशय गुन्हे शाखेला आहे. त्या दृष्टीने आरोपींकडे कसून चौकशी सुरू आहे.

अमली पदार्थविरोधी पथकाच्या कांदिवली शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांना या टोळीबाबत माहिती मिळाली होती. पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली माने, साहाय्यक निरीक्षक शशिकांत आयरे, हवालदार विनोद सरकार, नारायण धूमकर, पोलीस नाईक मांजरेकर, पेंढारकर, पाटील, डोंबरे आणि ममता वैती या पथकाने पाळत ठेवून या पाच तरुणांना अटक केली. आरोपींकडून १४०० एलएसडी पेपर (टपाल तिकिटाच्या आकाराचे, छोटे) हस्तगत करण्यात आले. प्रत्येक एलएसडी पेपर पाच हजार रुपयांचा विकला जाई.

अरबाज मोहम्मद खान (२०), फरहान अली खान (२६) हे या टोळीतील प्रमुख आरोपी. दोघे चुलत बंधू असून अंधेरीचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील बिल्डर आहेत. यातील अरबाज बीएमएसचे शिक्षण घेतो आहे, तर फरहान वडलांच्या बांधकाम व्यवसायासह वाहन खरेदी विक्री करतो.

दोघे गेल्या वर्षभरापासून अमेरिकेतील आपल्या मित्राकरवी एलएसडी पेपर कुरिअरने मागवतात. हे एलएसडी पेपर ते स्वत: आणि अदम्य मोदी (२२), चिराग जैन (२४) आणि लक्ष्मण ऊर्फ निखिल राजन (२४) या साथीदारांच्या मदतीने शहरातील महाविद्यालये, नाईट क्लब, डिस्को, पबमध्ये विकतात. यापैकी मोदी झी टीव्हीत साहाय्यक निर्माता आहे. जैन वाणिज्य शाखेत तिसऱ्या वर्षांचा अभ्यास करतो आहे, तर राजन हार्डवेअर इंजिनीअर आहे.

एलएसडीनक्की काय आहे ?

एलएसडी हा रासायनिक अमली पदार्थ असून त्याची निर्मिती मुख्यत्वे अमेरिकेत अवैध पद्धतीने केली जाते. एलएसडी साखरेच्या दाण्याप्रमाणे असते, ज्याला रंग, वास नसतो. मात्र त्याची चव किंचित कडू असते. हा पदार्थ वितळवून द्रव स्वरूपातही विकला जातो. मात्र मोठय़ा प्रमाणात द्रव रूपातील एलएसडीचा एक थेंब टपाल तिकिटाच्या आकाराच्या कागदी तुकडय़ांवर ओतून, हे कागद सुकवले जातात. पुढे या छोटय़ा छोटय़ा कागदांची विक्री केली जाते. त्याला एलएसडी पेपर म्हणतात. हा पेपर चघळल्यास किंवा टाळूला चिकटवून ठेवल्यास विरघळतो. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये त्याची नशा होते. व्यक्तीचे भाव क्षणात बदलतात. मेंदू आणि शरीरावरील नियंत्रण सुटते. साधारण १५ ते १४ तासांपर्यंत एलएसडी पेपरची नशा राहते. एलएसडी आणि रेव्ह पाटर्य़ाचे अतूट समीकरण आहे.