ठाणे रेल्वे यार्डाच्या आधुनिकीकरणासाठी शनिवार रात्रीपासून २६ तासांहून अधिक वेळ घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे कसे हाल होणार आहेत, याची चुणूक शनिवारी सकाळपासूनच अनुभवण्यास मिळाली. ५० मिनिटांपेक्षा जास्त वेळ जलद गाडय़ांचा खोळंबा तर धीम्या मार्गावरील गाडय़ा ३० ते ३५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.
ठाणे यार्डाचे आधुनिकीकरण, पाचव्या-सहाव्या मार्गाच्या विद्युतीकरणातील बदल आणि रूळ रिले इंटरलॉकींगच्या कामासाठी शनिवारी २९ डिसेंबरच्या रात्री ९.१५ नंतर प्रथम ११ तास ४५ मिनिटांचा आणि नंतर १६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला. यामुळे काही गाडय़ा रद्द तर काही गाडय़ा अन्य मार्गावर वळविण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा दिवसभर सर्वच स्थानकांवर करण्यात येत होती. मात्र शनिवार सकाळपासूनच उपनगरी गाडय़ांच्या घोळास सुरुवात झाली. सर्व गाडय़ा तब्बल किमान अर्धा तास विलंबाने धावत होत्या. यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात येत नव्हती. सकाळपासून कामावर निघालेल्या मुंबईकरांची प्रत्येक स्थानकावर गर्दी झाली होती.
दुपारी उशिरा या स्थितीमध्ये सुधारणा होण्याऐवजी आणखी बिघडत गेली. जलद मार्गावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या गाडय़ा तब्बल ५० मिनिटे उशीरा येत होत्या. घाटकोपर, कुर्ला, दादर, छत्रपती शिवाजी टर्मिनस या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होतीच पण करीरोड, चिंचपोकळी या छोटय़ा स्थानकांवरही गर्दी दिसत होती. हार्बर मार्गावरही गाडय़ांचा गोंधळ सुरू होता. हार्बर मार्गावरील स्थानकांवरही प्रवाशांची गर्दी दिसत होती. सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचीही गर्दी प्रत्येक स्थानकावर दिसत होती.