‘विमान कंपन्यांचा कारभार सेकंदांच्या हिशोबात चालतो’ हे पु. लं.च्या ‘अपूर्वाई’मधील वाक्य खोटे ठरवणारा प्रकार शनिवारी संध्याकाळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला. एअर इंडिया कंपनीचे रियाधला जाणारे विमान उशिराने सुटणार होते. मात्र नव्याने दिलेल्या वेळेतही हे विमान सुटणार नसल्याचे कळताच प्रवाशांच्या प्रतीक्षेचा व सहनशिलतेचा बांध फुटला आणि विमान कंपनीचे कर्मचारी व प्रवासी यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. सुदैवाने विमानतळ प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी, सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत गोंधळ आटोक्यात आणला.
एअर इंडियाचे मुंबईहून रियाधला जाणारे विमान उशिराने सुटणार असल्याची कल्पना विमानातील सर्वच २३० प्रवाशांना देण्यात आली होती. हे विमान सुधारित वेळेत म्हणजेच शनिवारी संध्याकाळी ५.१० ला सुटेल, असे या प्रवाशांना सांगण्यात आले. मात्र रियाधवरून येणारे विमानच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उशिराने उतरल्याने ५.१० वाजताची सुधारित वेळ पाळणेही कंपनीला शक्य झाले नाही. अखेर नव्याने सुधारित वेळी म्हणजेच संध्याकाळी ७.४५ वाजता या विमानाने हवेत झेप घेतल्याचे एअर इंडियातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, या प्रवाशांपैकी काही प्रवाशांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची छायाचित्रे आपल्या भ्रमणध्वनीमध्ये काढण्यास सुरुवात केली. या गोष्टीला कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेत ही गोष्ट नियमबाह्य असल्याचे सांगितले.