केसपेपरपासून तपासणी अहवालापर्यंत सर्वच ठिकाणी नातलगांचीच धावाधाव; ‘पास’बाबतच्या र्निबधांवर नाराजी

रुग्ण तिसऱ्या मजल्यावर दाखल असताना एक्स-रेची सोय तळमजल्यावर.. रक्त तपासणीचे केंद्र एका दिशेला तर मूत्र तपासणीचे केंद्र दुसऱ्या टोकाला.. प्रत्येक विभागात लागलेली रांग आणि केसपेपर काढण्यापासून खाटा मिळवण्यापर्यंतच्या प्रत्येक कामासाठी करावी लागणारी धावाधाव.. अशी परिस्थिती सगळ्याच सरकारी व पालिका रुग्णालयांमध्ये आढळून येत असताना एक किंवा दोन नातेवाईकांच्या बळावर हे सगळे कसे काय निभावून न्यायचे, असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांना भेडसावू लागला आहे.

पालिका व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णाची शुश्रूषा करण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून क्वचितच होत असते. बऱ्याचदा कामाच्या ताणामुळे किंवा ‘सरकारी’ मनोवृत्तीमुळे हे कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांनाच कामाला लावतात. अशा वेळी रुग्णाजवळ थांबायचे की तपासण्यांचे अहवाल किंवा औषधे आणण्यासाठी धावपळ करायची, असा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांसमोर असतो. त्यामुळे डॉक्टरांवर हल्ले होऊ नयेत, यासाठी रुग्णाच्या पासवर दोन नातलगांनाच प्रवेश देण्याच्या पालिका आयुक्तांच्या निर्णयावर रुग्णांच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

या रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण हे गरीब असतात. डॉक्टर सांगतील तसे ते वागत असतात. त्यांची तर यात चांगलीच फरफट होते, अशी भावना एका पालिका रुग्णालयात वैद्यकीय समुदेशक म्हणून काम करणाऱ्या महिलेने व्यक्त केली.

रक्त तपासणीच्या रिपोर्टपासून ते एक्स-रे अथवा सिटी स्कॅन काढण्यासाठी रुग्णाचे नातेवाईकच मदत करीत असतात. यासाठी त्यांना मनुष्यबळ लागते हे रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरच नव्हे तर मार्डच्या निवासी डॉक्टरांनाही मान्य आहे. पालिका असो की राज्य शासनाची रुग्णालये असोत, तेथील परिचारिका व वॉर्ड बॉय यांच्यावर डॉक्टरांचे नियंत्रण कागदोपत्रीच असते. परिचारिकांनाही बरेच कागदी घोडे नाचवावे लागत असल्यामुळे अनेकदा रुग्णांना औषध देण्याचे कामही नातेवाइकांनाच करावे लागते अशी परिस्थिती जवळपास सगळीकडेच आहे, अशी परिस्थिती शीव रुग्णालयामधील एका डॉक्टरांनी कथन केली.

‘साहेब, माझ्या १२ वर्षांच्या मुलाची शी-शूही मलाच काढावी लागते. त्याची शस्त्रक्रिया झाली आहे. त्याला कुशीवर वळविण्यापासून सर्वच आम्हीच बघतो,’ हे रमाबाई कदम यांचे उद्गार बोलके आहेत. अशा परिस्थितीत नातेवाईकांच्या रुग्णालयातील संख्येवर र्निबध घालणे म्हणजे आणखी अनागोंदीला आमंत्रित करण्यासारखे आहे, असे एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. याशिवाय स्थानिक नेते, नगरसेवक, समाजसेवक येतात ते ताफा घेऊन, त्यांना कसे रोखणार, हा कळीचा सवालही या डॉक्टरने उपस्थित केला.