31 May 2016

पवारांचा आता पुतण्यालाच कात्रजचा घाट!

महाराष्ट्राच्या राजकारणात भल्याभल्यांना कात्रजचा घाट दाखविण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आता

खास प्रतिनिधी मुंबई | December 25, 2012 4:58 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात भल्याभल्यांना कात्रजचा घाट दाखविण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आता हे अस्त्र बहुधा आपले पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही उगारले आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. कारण मंत्रिमंडळात प्रवेश केल्यावर तब्बल दोन आठवडे बिनखात्याचे मंत्री म्हणून काम केल्यावर आता तरी खाते द्या, अशी विनवणी करण्याची वेळ अजितदादांवर आली. मागितले तर आता दिले, असे सांगत शरद पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये योग्य तो संदेश दिला आहे.  
सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनंतर अजित पवार यांनी राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांना फारसा रुचला नव्हता. राजीनाम्यानंतर पुढील तीन दिवसांतील वक्तव्यांवरून ते स्पष्ट झाले होते. सिंचनाची श्वेतपत्रिका सादर झाली तरी हिवाळी अधिवेशनानंतरच अजितदादांचा समावेश होईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण अजितदादांच्या आग्रहामुळेच त्यांचा अधिवेशनापूर्वी दोन दिवस आधी मंत्रिमंडळात फेरप्रवेश करण्यात आला. मंत्रिमंडळात परतले तरी अजितदादा संपूर्ण अधिवेशन काळात बिनखात्याचे मंत्री होते. अधिवेशनाकरिता वित्त आणि ऊर्जा खात्यांच्या मंत्र्यांनी तयारी केली आहे. यामुळे आपणच अधिवेशनानंतर ही खाती स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सांगितले होते तरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. कारण बिनखात्याचे मंत्री वावरणे अजितदादांसारख्या आक्रमक नेत्याच्या स्वभावातच नाही. पवार यांच्या सूचनेवरूनच अजितदादांना बिनखात्याचे मंत्री ठेवण्यात आले होते, असे मुख्यमंत्र्यांच्या गोटातून हिवाळी अधिवेशनाच्या काळात सांगण्यात येत होते.
अधिवेशनानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी वित्त आणि ऊर्जा खात्याचा पदभार स्वीकारणार असल्याचे अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या काळात पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. खात्याचा पदभार मिळण्यात अडचणी येऊ शकतात हे लक्षात आल्यानेच बहुधा अजितदादांनी बारामतीत नाटय़संमेलनाच्या उद्घाटन समारंभात हा विषय उपस्थित केला. वास्तविक नाटय़संमेलनात मला खाते द्या ही मागणी करण्याचे ते व्यासपीठ नव्हते. अस्वस्थता वाढल्यानेच बहुधा अजितदादांनी या व्यासपीठाचा उपयोग करून घेतला. त्यावर कोणाला मंत्रिपद वा खाते द्यायचे हे आमच्या पक्षात मी ठरवितो याचा आवर्जून उल्लेख शरद पवार यांनी केला याकडे लक्ष वेधण्यात येते.
राष्ट्रवादीत आतापर्यंत सारे काही अजितदादांच्या मनाप्रमाणे होत होते. पण पक्षात माझाच शब्द अंतिम असेल हे सूचित करून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अजितदादांच्या समर्थकांनाही योग्य तो संदेश दिला आहे.     

First Published on December 25, 2012 4:58 am

Web Title: pawar now shows katraj to ajit pawar
टॅग Ajit-pawar,Katraj,Ncp