गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेबरोबर येण्याची तयारी दाखविली होती, तसा निरोपही त्यांच्याकडून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यास संमतीही दिली होती, पण आयत्या वेळी पवारांनीच शब्द फिरविला, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी शुक्रवारी केला. महाराष्ट्रातील राजकारणात आकारास येणाऱ्या आणि फसलेल्या समीकरणांचा उलगडा करतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयीही मनोहर जोशी यांनी सविस्तर उलगडा केला. बाळासाहेब आज हयात असते, तर माझा जाहीर अपमान कधीच झाला     नसता आणि तो करण्याची कोणाचीही िहमत झाली नसती. गैरसमजातून मी काही पहिल्यांदाच बळीचा बकरा झालेलो नाही. बाळासाहेबांकडे झटपट न्याय आणि निर्णय असायचा. त्यांच्या उक्ती व कृती यात कधीही अंतर नव्हते, पण..’ मनोहर जोशी या क्षणिक विरामातून बरेच काही सांगून गेले.
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’च्या व्यासपीठावर गेल्या निवडणुकीच्या राजकीय सारिपटावरील खेळी उलगडून दाखवितानाच जोशी यांनी शिवसेना ‘काल, आज आणि उद्या.’चा ‘सरांच्या’ चष्म्यातून आढावाही घेतला. शरद पवार यांचा समावेश भविष्यात एनडीएमध्ये होण्याची शक्यता आहे का, असे विचारल्यावर पवार हे कधी शब्द फिरवितील आणि बदलतील, याचा भरवसा नसल्याचे सांगून जोशी यांनी त्या वेळी फसलेल्या राजकीय खेळीचा गौप्यस्फोट केला. ‘गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर येण्याचे अगदी ठरले होते. पेडर रोडवरील पवार यांच्या एका मराठी उद्योगपती स्नेह्य़ाच्या घरी माझी त्यांच्यासमवेत बैठकही झाली, पण आयत्या वेळी ‘हे आता जमणार नाही’, असे सांगून पवार यांनी शब्द फिरविला, असा उलगडा जोशी यांनी केला. या समीकरणात भाजपची साथ होती की नव्हती की ती सोडली जाणार होती, याबाबत मात्र जोशी यांनी कोणताच उल्लेख केला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी पुढाकार घेणाऱ्या पवार यांनी पुढे मात्र काहीच केले नाही, हा त्यांचा दुसरा अनुभव होता, असे सांगून जोशी यांनी पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
शिवसेनेतच राहीन!
शिवसेनाप्रमुखांची सुमारे ४५ वर्षे साथ केल्यानंतर झालेला अपमान, शिवसेना- कालची व आजची, उद्धव यांचे नेतृत्व, आदित्य ठाकरे यांचा उदय, राज आणि उद्धव यांच्यात झालेला जाहीर वाद अशा विविध अडचणींच्या प्रश्नांमधूनही जोशी यांनी ‘सराईत’ मार्ग काढला. शिवसेनाप्रमुखांच्या कार्यकाळात प्रेम, मानसन्मान, महत्त्वाची पदे भूषविण्याची संधी मिळाल्यावर अपमानाच्या काटेरी मार्गावरून चालत असताना काय वाटते, अजूनही सेनेत कशासाठी, अशा प्रश्नांच्या सरबत्तीवर आपल्या भावनांना मोकळी वाट करून देताना सर उद्गारले, ‘महाराष्ट्रात मराठी माणसाची आणि देशात हिंदूूंची सत्ता आणण्याचे शिवसेनाप्रमुखांचे ध्येय होते. ते अजूनही अपुरे आहे. ते पूर्ण करण्यासाठीच अपमानाचा आवंढा गिळूनही मी अजून सेनेत आहे व राहीन..!’   मध्यस्थीस तयार..
आकाश आणि जमीनही कुठेतरी एकत्र येतात. मग मराठी माणसाच्या हितासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे आवश्यकच आहे, पण तो दिवस कधी येईल हे सांगण्यास मी ज्योतिषी नाही, अशी कोपरखळी जोशीसरांनी मारली. एकाने जरी एकत्र येण्याची इच्छा दाखविली तर त्यासाठी मध्यस्थी करण्यास मी तयार आहे, असेही जोशी म्हणाले.
सविस्तर वृत्तांत/रविवारच्या अंकात