रेडिओलॉजिस्टच्या संपाला स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना आणि एएमसीचा पाठिंबा

गर्भलिंगदान कायद्यातील जाचक कारवाई रोखण्यासाठी खासगी रेडिओलॉजिस्ट संघटनांबरोबर देशातील स्त्रीरोग तज्ज्ञ आणि असोसिएशन मेडिकल कन्स्लटंट संस्थेने पाठिंबा दर्शविला असून नवी मुंबई आणि मुंबई भागातील १ हजार स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर बेमुदत कामबंद संपात सामिल झाले आहेत. नवी मुंबई आणि वांद्रे, माहिम या भागातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांचे आरोग्य केंद्र बंद राहणार आहेत. त्यामुळे या भागात खाजगी सोनेग्राफी सेवा बंद राहणार आहे. मात्र पालिका, सरकारी रूग्णालये, आरोग्य केंद्रे सुरू राहणार आहेत.

दोन महिन्यांपूर्वी पुण्यात गर्भलिंगदान कायद्याअंतर्गत रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती त्याविरोधात राज्यात रेडिओलॉजिस्टनी आंदोलन पुकारले होते.

राज्यसरकारने कायद्यात शिथिलता आणण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतरही गर्भलिंगदान या जाचक कायद्यात बदल करण्यात आले नाही. त्यामुळे सध्या गर्भलिंगदान कायद्यातील जाचक नियमांविरोधात राग असून देशभरात रेडिओलॉजिस्टनी बेमुदत संपाचे हत्यार उगारले आहे.

गर्भलिंगनिदान कायद्यात डॉक्टरने अ‍ॅर्पन घातले नाही अशा चुकांसाठीही रेडिओलॉजिस्ट डॉक्टराचे पद रद्द होऊन त्याला न्यायालयीन शिक्षा भोगावी लागते. असे जाचक नियम शिथिल करावे अशी मागणी करण्यात आली आहे, असे भारतीय रेडिओलॉजिस्ट असोसिएशनचे (आयआरआयए) अध्यक्ष डॉ. ओ.पी. बंसल यांनी यावेळी सांगितले.

आमच्या संघटनेने नेहमीच बेटी बचाव कार्यक्रमाला पाठिंबा दिला आहे आणि आम्ही गर्भलिंग ओळख चाचणीच्या विरोधात आहोत. मात्र गर्भलिंगदान कायद्यामुळे प्रामाणिक डॉक्टरांची हेळसांड केली जात आहे. यापूर्वी या कायद्याविरोधात सरकारसोबत पत्रव्यवहार झाला आहे. मात्र सरकार याबाबत निष्काळजी आहे.

– डॉ. वीणा पंडित, अध्यक्ष असोसिएशन ऑफ मेडिकल कन्स्लटंट

आमचा रेडिओलॉजिस्टच्या संपाला पूर्ण पाठिंबा असून नवी मुंबई आणि मुंबईतील १ हजार स्त्रीरोगतज्ज्ञ कामबंद आंदोलन करणार आहेत. पीसीपीएनडीटी या कायद्यातील जाचक अटींवर शिथिलता आणण्याची गरज आहे. या कायद्यातील जाचक अटींमुळे डॉक्टरांना वेठीस धरले जात आहे.

– डॉ. मोहन गेडाम, स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना(एएफजी)