पालिकेचा उच्च न्यायालयात दावा

दक्षिण कोरियाहून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयामध्ये आणलेल्या परदेशी पाहुण्यांची आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. सातही पेंग्विन्सचे आरोग्य उत्तम असून त्यांना आवश्यक ते पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यात आहे, असा दावा पालिकेतर्फे सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. शिवाय या पेंग्विनचे प्रदर्शन तूर्त तरी सर्वसामान्यांना खुले केले जाणार नसल्याचा दावाही पालिकेच्या वतीने या वेळी करण्यात आला.

जुलै महिन्यात दक्षिण कोरियाहून आठ पेंग्विन वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणण्यात आले होते; परंतु या परदेशी पाहुण्यांना येथे आणल्यानंतर तीन महिन्यांतच त्यातील एकाचा मृत्यू झाला. आपल्याकडील वातावरण या परदेशी पाहुण्यांना पोषक नाही. तसेच त्यांची आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्यानेच एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे उर्वरित पेंग्विनना वाचवण्याच्या दृष्टीने त्यांना दक्षिण कोरियाला परत पाठवण्याची मागणी अ‍ॅड्. अद्वैत सेठना यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. याशिवाय याचिका प्रलंबित असेपर्यंत सर्वसामान्यांसाठी त्यांच्या केल्या जाणाऱ्या प्रदर्शनालाही मज्जाव करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळी अ‍ॅड्. अनिल साखरे आणि जोएल कार्लोस यांनी पालिकेतर्फे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात या पेंग्विनसाठीच्या विशेष ऑडिटोरियमचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना त्यांचे प्रदर्शन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच त्यांना सध्या स्वतंत्र अशा जागेत ठेवण्यात आले असून तेथे केवळ पशुवैद्यक आणि साहाय्यकांना जाण्याची परवानगी आहे. शिवाय त्यांची आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे. त्यांचे आरोग्य उत्तम आहे. त्यामुळे त्यांना परत पाठवण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. एवढेच नव्हे, तर पेंग्विनना पाहता येईल, असे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे भारतातील एकमेव आहे. तसेच त्यांना जेथे ठेवण्यात आले आहे तेथील तापमानावर अभियंत्यांकडून देखरेख ठेवण्यात येत आहे. त्यांच्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या ऑडिटोरियमचे काम अखेरच्या टप्प्यात असून ते पूर्ण झाले की या पेंग्विनना तेथे हलवले जाईल, असेही पालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. शिवाय येथे आणल्यानंतर एका पेंग्विनचा मृत्यू झाला. मात्र त्याला येथे आणण्यात आले त्या वेळीच त्याच्या शरीरात जिवाणू होते. त्यामुळे येथे आणल्याने त्याचा मृत्यू झाला, असे म्हणणे चुकीचे असल्याचा दावा पालिकेने केला आहे.