आपल्या घराला धडक देण्याची शक्यतेमुळे संतापलेल्या गिरगाव, चिराबाजर परिसरातील रहिवाशांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी ‘मेट्रो-३’या प्रकल्पासाठी पाठविण्यात आलेल्या नोटिसीची होळी केली. त्याचबरोबर शिवसेनेने या भागात मोठय़ा प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम हाती घेतली असून रहिवाशांकडून त्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.कुलाबा-वांद्रे-सीप्झ अंधेरी दरम्यान धावणाऱ्या ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या मार्गात नेमक्या किती इमारतींचा बळी जाणार, या प्रकल्पामुळे बेघर होणाऱ्या रहिवाशांचे स्थलांतर कोठे करणार, जलस्रोतांवर होणारे परिणाम आदी अनेक प्रश्न अनुत्तरित असल्यामुळे शिवसेनेने ‘मेट्रो-३’ विरोधात आंदोलन सुरू केले आहे. चिराबाजार परिसरातील दीडशे वर्षे जुनी चिराबाजार मंडईदेखिल या प्रकल्पाआड येत आहे. त्यामुळे मंडईचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. परंतु एमएमआरडीएकडून कोणताच खुलासा करण्यात येत नसल्यामुळे या भागातील रहिवाशी प्रचंड संतापले आहेत.