खार-वांद्रय़ात २० ते २५ गुन्हे केल्याची कबुली

खार, वांद्रय़ातील उच्चभ्रू परिसरात रात्रीच्या वेळेस शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या महिला, तरुणींचा विनयभंग करून पळणाऱ्या विकृत तरुणाला गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. चौकशीदरम्यान त्याने अशा प्रकारे २० ते २५ गुन्हे केल्याची माहिती दिली आहे. जिब्रान सय्यद (२८) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात याआधी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणे, बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये खार, वांद्रय़ातील पाली हिल, रिझवी महाविद्यालय, माऊंट मेरी, बॅण्ड स्टॅण्ड परिसरात रात्रीच्या वेळेस महिलांच्या विनयभंगाचे प्रकार वाढले होते. खार पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या दोन तक्रारी आल्या होत्या. या घटनांमध्ये विनयभंगानंतर आरोपी चॉकलेटी रंगाच्या दुचाकीवरून दिसला. या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती. तसेच मागील बाजूस चमचमणारे दोन दिवे दिसत होते. हाच धागा पकडून गुन्हे शाखेच्या वांद्रे कक्षाचे प्रभारी निरीक्षक महेश देसाई, साहाय्यक निरीक्षक नितीन पाटील यांनी आपल्या खबऱ्यांना सतर्क केले. तेव्हा अशा प्रकारची दुचाकी वांद्रे बेहरामपाडय़ातील जिब्रान वापरतो, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांच्या हाती लागली. त्यानुसार जिब्रानची माहिती मिळवण्यात आली. गुरुवारी दुपारी जिब्रान कार्टर रोड परिसरात उपस्थित असून आपले लक्ष्य शोधतो आहे ही माहिती मिळताच पाटील व पथक तातडीने तेथे रवाना झाले. पोलिसांना पाहून जिब्रानने तेथून पळ काढला. मात्र, पोलीस पथकाने पाठलाग करून त्याला खारदांडा परिसरात ताब्यात घेतले. कक्ष कार्यालयात आणून केलेल्या चौकशीत जिब्रानने अलीकडच्या काळात खार, वांद्रे येथे सुमारे २० ते २५ तरुणी, महिलांचा भररस्त्यात विनयभंग केल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले.