शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी यांना तुरुंगात लॅपटॉप, रेजर आणि सुकामेवा हवा आहे. त्यांनी त्याबाबत सीबीआय न्यायालयाला पत्र लिहिले आहे. मला माझे आत्मचरित्र लिहायचे आहे तेव्हा कृपया मला लॅपटॉप वापरण्याची परवानगी देण्यात यावी असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. मी कागद आणि पेन घेऊन लिहिण्याचा प्रयत्न केला परंतु मला तसे लिहिणे कठिण जात आहे तेव्हा कृपा करुन मला दिवसातील चार तास लॅपटॉप वापरण्याची परवानगी द्यावी असे त्यांनी म्हटले आहे.

चार तासानंतर मी माझा लॅपटॉप परत करीत जाईल असे त्यांनी म्हटले. या लॅपटॉपला इंटरनेट कनेक्शन देखील नको तेव्हा माझे लोकेशन डिटेक्ट देखील होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझे वय झाले असून मला लवकरच शीण येतो. तेव्हा लॅपटॉपवर काम केल्यास मला तो त्रास होणार नाही. माझे वय ६१ वर्षे आहे माझ्या मेंदूला लवकर थकवा येतो. जर तुम्ही मला लॅपटॉप दिला तर माझे आत्मचरित्र लिहिण्याचे काम लवकर संपेल असे त्यांनी म्हटले.

याबरोबरच त्यांनी सुकामेवा खाण्याची परवानगी देखील न्यायालयाला मागितली आहे. मी सध्या डाएटवर असून मला सुकामेवा खाण्याची परवानगी देण्यात यावी असे त्यांनी सीबीआय न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
तसेच, वेगळा रेझरदेखील बाळगण्याची परवानगी देण्यात यावी असे ते म्हणाले. तुरुंगात सगळ्यांची एकाच रेजरने दाढी करतात तेव्हा मला संसर्ग होण्याचा धोका वाटतो असे त्यांनी म्हटले.

त्यांच्या भाचीचे १९ डिसेंबरला बंगळुरू येथे लग्न आहे. त्या लग्नाला जाण्याची परवानगी मला देण्यात यावी असे पीटर मुखर्जी यांनी म्हटले आहे. या सर्व अर्जांवर १४ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतर पीटर मुखर्जी यांना या गोष्टी मिळतील की नाही हे कळेल.

इंद्राणी मुखर्जी यांना नोटा जमा करण्याची परवानगी

शीना बोरा प्रकरणातील आरोपी आणि पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी यांना पाचशे आणि हजारच्या नोटा बॅंकेत जमा करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. सुमारे ५०,००० रुपये किमतीच्या नोटा जमा करण्याची परवानगी न्यायालयाने दिली. एखाद्या बाहेरील व्यक्तीकडून त्या नोटा बॅंकेत जमा करा असे इंद्राणी यांना न्यायालयाने सांगितले.