पीटरच्या कोठडीत सोमवापर्यंत वाढ; शीनाच्या नावे सिंगापूरमध्ये खाते
शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांनी २००६-०७ वर्षी परदेशात बऱ्याच कंपन्या उघडल्या आणि त्यात ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे पीटरच्या चौकशीतून उघड झाले आहे, अशी माहिती सीबीआयने गुरुवारी मुंबईतील महानगरदंडाधिकाऱ्यांना दिली. एवढेच नव्हे, तर सिंगापूरमधील ‘एचएसबीसी’ बँकेत शीनाच्या नावेही खाते उघडण्यात आले होते व इंद्राणीने आर्थिक गैरव्यवहाराचा पैसा त्यात वळवला होता, असेही पुढे आले आहे. त्यामुळे पीटर-इंद्राणीच्या या आर्थिक व्यवहारांच्या चौकशासाठी इंटरपोलची मदत मागितली आहे. तशी माहिती सीबीआयच्या गुरुवारी न्यायालयाला दिली. न्यायालयाने पीटरच्या सीबीआय कोठडीत ३० नोव्हेंबपर्यंत वाढ केली आहे.
शीनाच्या हत्येसाठी आर्थिक गैरव्यवहार हेही मुख्य कारण होते, असा आरोप सीबीआयने आरोपपत्रात केला आहे. त्यामुळे या आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीनेच पीटरची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत पीटर आणि इंद्राणी यांनी २००६-०७ मध्ये परदेशात बऱ्याच कंपन्या उघडल्या आहेत. त्यात त्यांनी ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पीटर आणि इंद्राणी यांची परदेशात बरीच बँक खाती आहेत. सिंगापूर येथील ‘एचएसबीसी’ बँकेत शीनाच्या नावेही खाते आहे. पीटर आणि इंद्राणी यांनी आर्थिक व्यवहारातील पैसा शीनाच्या या खात्यामध्ये वळवला होता. सिंगापूरमधील ‘डीबीएस’ बँकेत नोकरी करणारी इंद्राणीची मैत्रीण गायत्री आहुजा हिने तिला शीनाचे खाते उघडण्यात मदत केली होती, अशी माहितीही पीटरच्या चौकशीत उघड झाले होते.
पीटर आणि इंद्राणीच्या नावे असलेल्या ‘९एक्स मीडिया प्रा.लि.’च्या अंतर्गत लेखा परीक्षणात मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले होते. गंभीर घोटाळे चौकशी कार्यालय आणि प्राप्तिकर खात्याकडून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळेच त्यांच्या परदेशातील गैरव्यवहारांची अधिक माहिती मिळवण्यासाठी पीटरची कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयने न्यायालयाकडे केली. तसेच या प्रकरणी इंटरपोलचही मदत घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.