संकेतस्थळावर उशिरा सूचना दिल्याने विद्यार्थ्यांच्या मनस्तापात भर
खासगी संस्थांमधील पदव्युत्तर वैद्यकीय व दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता रविवारी (१४ फेब्रुवारी) होणाऱ्या ‘पदव्युत्तर सामाईक प्रवेश परीक्षे’ला (पीजी-सीईटी) उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने एमएमयूपीएमडीसी या खासगी संस्थाचालकांच्या संघटनेने शनिवारी ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या बाबतची सूचना शनिवारी सायंकाळी उशिरा संकेतस्थळावर देण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या मनस्तापात भरच पडली. कारण, ही परीक्षा केवळ मुंबईतीलच परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार होती. मात्र, परीक्षा रद्द झाल्याची सूचना उशीरा मिळाल्याने दूर राहणारे अनेक विद्यार्थी परीक्षा देण्याकरिता म्हणून मुंबईला रवाना झाले होते.
राज्यभरातून तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज भरले होते. १४ फेब्रुवारीच्या या परीक्षेकरिता १२ फेब्रुवारीपर्यंत तीन हजार रुपये भरून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया एएमयूपीएमडीसीने सुरु ठेवली होती. तसेच, ज्यांना संघटनेच्या बँकेच्या खात्यावर पैसे भरणे शक्य होणार नव्हते त्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रावर रोख रकमेद्वारे अथवा धनादेशाद्वारे पैसे स्वीकारण्याची तयारीही दर्शविली होती. परंतु, परीक्षाच रद्द झाल्याने सगळेच मुसळ केरात गेले आहे. राज्य सरकारच्या पीजी-सीईटीत सहभागी न होता स्वतंत्र परीक्षा घेण्याचा संस्थाचालकांच्या या अट्टहासाचा सर्वाधिक मनस्ताप मात्र विद्यार्थी-पालकांना सहन करावा लागतो आहे. या सीईटीतून वैद्यकीयच्या ६५ तर दंत वैद्यकीयच्या २५३ पदव्युत्तर जागा भरण्यात येणार होत्या. न्यायालयाने संस्थाचालकांना अंतरिम दिलासा दिला नसतानाही त्यांनी १४ फेब्रुवारीला स्वतंत्र पीजी-सीईटी घेण्याचे जाहीर केले होते.

संस्थाचालक सर्वोच्च न्यायालयात
खरेतर या परीक्षेला न्यायालयाने सुरवातीला हिरवा कंदिल दाखविला होता. मात्र, शुक्रवारी आपले हे आदेश मागे घेत या परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खासगी संस्थाचालकांचे धाबे दणाणले होते. आता संस्थाचालकांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात ‘स्पेशल लिव्ह पिटीशन’ दाखल करत आव्हान देण्याचे ठरविले आहे. मात्र, वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करूनही इतक्यात सुनावणी होण्याची शक्यता नाही. परिणामी सायंकाळी उशीरा परीक्षा रद्द करण्याची सूचना संघटनेने आपल्या संकेतस्थळावर दिली.
५ मेची सीईटीही अडचणीत
दरम्यान, या निर्णयामुळे एमएमयूपीएमडीसीची ५ मे रोजी एमबीबीएस व बीडीएस या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सीईटीही अडचणीत आली आहे. कारण, राज्यातील सर्व सरकारी, खासगी विनाअनुदानित वैद्यकीय अभ्यासक्रमांकरिताही राज्याच्या सीईटी कक्षातर्फे सीईटी होणार आहे.