युसुफ कार्श (१९०८-२००२) हे अत्युच्च दर्जाचे छायाचित्रकार, केवळ व्यक्तिचित्रणपर छायाचित्रांसाठी प्रख्यात होते. त्यांच्या छायाचित्रांतून जगाच्या इतिहासाची पानं उलगडतात.. तसं भारतात कोण? – श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिलेलं उत्तर आहे : जितेंद्र आर्य (१९३१- २०११)! या जितेंद्र आर्य यांच्या समग्र कामाचा आढावा घेणारं प्रदर्शन मुंबईत सध्या सुरू आहे. ‘एनजीएमए’ म्हणजे राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात हे प्रदर्शन ८ ऑक्टोबपर्यंत (सोमवार आणि दसऱ्याच्या सुटीखेरीज) सकाळी ११ ते सायं. ४.३० पर्यंत पाहता येईल.

प्रदर्शनात सुरुवातीलाच रणधीर कपूर, ऋ षी कपूर यांची त्यांच्या-त्यांच्या (आता मोठय़ा, पण तेव्हा लहान) मुलांसोबतची छायाचित्रं आहेत, आजच्या तरुणांनाही सहज ओळखू येतील अशा अभिनेते-अभिनेत्रींचे ग्लॅमरस फोटो आहेत.. ज्या दोन नियतकालिकांच्या मुखपृष्ठांवरली अनेक छायाचित्रं जितेंद्र आर्य यांनी नोकरीचा भाग म्हणून टिपली, त्या मुखपृष्ठांची अख्खी मोठी भिंतच आहे.. पुढे, अभिनेत्री नूतन हिच्या छायाचित्रांपासून मात्र या प्रदर्शनाचा खरा सूर सापडतो.. नूतनच्या विशीपासून साठीपर्यंतची ही छायाचित्रं आहेत.. त्यातलं एक मुखपृष्ठासाठी, पण बाकी सगळी अगदी सहज टिपल्यासारखी..  ती खरोखर सहजच टिपली गेली की सहजपणाचा अभिनय होता, अशीही शंका पुढल्या काही छायाचित्रांतून येते. पण त्याहीपैकी काही छायाचित्रं खरोखरच सहज आहेत. नूतनचा बदलता चेहरा, कृशपणाकडे झुकत गेलेली – तरीही डौलदार देहयष्टी, हे आपल्याला दिसत राहतं आणि त्यातून काय जाणवतं? – हे नक्कीच जाणवतं की, या अनेक छायाचित्रांमधून बदलत गेलेला काळ दिसतो. अगदी चेहऱ्यांसकट दिसतो.

वरच्या मजल्यांवरच्या छायाचित्रांतून जितेंद्र आर्य यांचा जीवनपटही आपसूकच उलगडतो. पूर्व आफ्रिकेत वाढलेल्या जितेंद्र यांना किशोरवयात एक कॅमेरा भेट मिळाला, तेव्हापासून त्यांचा छायाचित्र प्रवास सुरू झाला आणि १९५१ साली, वयाच्या विसाव्या वर्षी ते लंडनला फोटोग्राफीच्या शिक्षणासाठी गेले. तत्कालीन ब्रिटिश अमलाखालच्या पूर्व आफ्रिकेत होणाऱ्या हॉलिवूड-चित्रीकरणांचे छायाचित्रकार म्हणून त्यांनी काम केले, पण काही महिन्यांतच- वडिलांच्या मृत्यूनंतर आईसह भावंडांना घेऊन- ते लंडनला येऊन तेथे स्थायिक झाले. तेथून पुढला प्रवास त्यांनी केला, तो मायदेशातच. आधी दिल्लीला, मग मुंबईला ते राहू लागले, १९५९ साली विवाह झाला तोवर ते मुंबईच्या फिल्मी क्षेत्रातील सुपरिचित व्यक्तिछायाचित्रणकार (पोटेर्र्ट फोटोग्राफर) म्हणून ओळखले जात होते. या कृष्णधवल सिनेमाक्षेत्रात रमण्यापूर्वी दिल्लीत त्यांनी नेहरूयुग अनुभवले होते. पंडित जवाहरलाल व इंदिरा नेहरू-गांधी, मुल्कराज आनंद, होमी भाभा आदी अनेकांची छायाचित्रे टिपली होती. सिनेमासंबंधित त्यांचे काम सर्वापुढे येत राहिले, पण ही फार प्रकाशित नसलेली छायाचित्रे या प्रदर्शनातच पाहायला मिळतील. कुमार गंधर्व किंवा पं. भीमसेन जोशी यांचे कुटुंबासह फोटो, महाराणी गायत्रीदेवी (तरुणपणीच्या आणि वयस्कर, तसेच त्यांचे व्यक्तिचित्र रंगविले जात असतेवेळी कॅनव्हासवरल्या चित्राच्या तुलनेत निस्तेज दिसणाऱ्या), टीपॉयवर आरसा ठेवून त्यापुढे मांडी घालून स्वतची दाढी करणारा दिलीपकुमार, असे क्षण हे ‘विषयव्यक्ती’ला जितेंद्र यांच्याबद्दल वाटणारा विश्वास दाखवून देतातच, पण आज हे सारे फोटो म्हणजे एका सरलेल्या कालखंडाची प्रतीकेही ठरतात.

बॉलीवूडचे अगदी १९५७-५८ पासून १९९०च्या दशकापर्यंतचे फोटो इथे आहेत. ते लक्षात राहतीलच. ओळखूही येतील, आपलेसे वाटतील.. पण इथल्या या आणि अन्य सर्व चेहऱ्यांमधून दिसत राहील तो आता कधीच हाती न येणारा गतकाळ.. तो जणू या चेहऱ्यांनी गोठवून ठेवला आहे!