विश्वासदर्शक ठराव मंजूर करताना विधानसभेत झालेल्या आवाजी मतदानाविरोधात उच्च न्यायालयात काँग्रेस पक्षासह अन्य काहींनी विविध याचिका केल्या आहेत. मात्र या याचिकांवर नेमक्या कुठल्या खंडपीठासमोर सुनावणी व्हावी याबाबत निर्माण प्रश्न शुक्रवारी मुख्य न्यायमूर्तीनी तडीस लावला. त्यामुळे सोमवारी या याचिकांवर सुनावणी होणार आहे.
या मुद्दय़ावरून काँग्रेस पक्षातर्फे रिट याचिका करण्यात आली आहे. तर संजय चिटणीस, राजकुमार अवस्थी यांनी जनहित याचिका केली आहे. याशिवाय केतन तिरोडकर यांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात फौजदारी जनहित याचिका करीत त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. या विविध याचिकांवर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. मात्र मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी प्रकरण सुनावणीसाठी न्या.विद्यासागर कानडे आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर वर्ग केले. परंतु न्यायमूर्तीच्या सोसायटय़ांप्रकरणी तिरोडकर यांनी याचिका केल्याने न्यायमूर्ती कानडे यांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. मात्र मुख्य न्यायमूर्ती परवानगी दिल्यास सुनावणी घेण्याचे स्पष्ट करीत प्रकरण सुनावणीसाठी सोमवारी ठेवले होते. न्यायालयाने हे स्पष्ट केले तरी तिरोडकर यांच्या याचिकेनंतर विश्वासमता-विरोधातील याचिकांवर नेमक्या कोणत्या खंडपीठासमोर सुनावणी होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सगळ्याच याचिकाकर्त्यांनी पुन्हा एकदा मुख्य न्यायमूर्तीकडे धाव घेतली आणि मुख्य न्यायमूर्तीनी तिरोडकर यांनी केलेली याचिका वगळता अन्य याचिकांवर न्यायमूर्ती कानडे आणि न्यायमूर्ती प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर, तर तिरोडकर यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती विजया कापसे ताहिलरामाणी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होईल हे स्पष्ट केले.
तत्पूर्वी, काँग्रेसच्या वतीने याचिका करण्यात येऊन सध्या अल्पमतातील सरकार सत्तेवर आहे आणि त्याचमुळे आपल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. परंतु न्यायालयाने तातडीने सुनावणीस नकार देत प्रकरण सोमवारी ठेवले.