*  अधिकृत प्रकाशक, लेखक-ग्रंथविक्रेत्यांना फटका
*  तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई नाही
*  ‘पायरसी’विरोधात आता मुख्यमंत्र्यांना साकडे
भ्रमणध्वनी, मेमरी कार्ड किंवा नवीन चित्रपटांच्या प्रतींना लागलेले बनावट प्रतींचे (पायरेटेड कॉपी) ग्रहण आता मराठी साहित्यालाही लागले आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्याच्या काही भागात रस्ते व पदपथावर गेल्या काही महिन्यांपासून पायरेटेड मराठी पुस्तकांची विक्री मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. या पायरेटेड मराठी पुस्तकांचा फटका अधिकृत प्रकाशक, लेखक आणि ग्रंथविक्रेत्यांना बसत आहे. या बाबत पोलिसांकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आता थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घालण्यात आले आहे.
अधिकृत प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांच्या बनावट प्रती अगदी कमी किंमतीत वाचकांना उपलब्ध होत असल्याने वाचकांकडूनही या पुस्तकांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. वीणा गवाणकर लिखित ‘एक होता काव्र्हर’, विश्वास पाटील लिखित ‘पानिपत’ आणि ‘महानायक’,  माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या इंग्रजी आत्मचरित्राचा ‘अग्निपंख’ हा मराठी अनुवाद, वि. स.खांडेकर लिखित ‘ययाती’, रणजित देसाई यांचे ‘स्वामी व ‘मृत्युंजय’ तसेच ‘राजा शिवछत्रपती’, ‘बटाटय़ाची चाळ’, ‘शाळा’ आणि अन्य काही पुस्तकांच्या बनावट प्रतींची खुले आम विक्री केली जात आहे.
मराठीतील १५ -२० प्रकाशन संस्थांना पायरेटेड पुस्तकविक्रीचा फटका बसला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांनी याविरोधात पोलिसांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. वीणा गवाणकर यांनीही अलीकडेच मुख्यमंत्र्यांना एक निवेदन सादर केले असून मराठी साहित्याला लागलेल्या या पायरसीच्या विरोधात ठोस कारवाई करण्यासाठी साकडे घातले
आहे.
अशा प्रकारे पायरेटेड पुस्तकांची विक्री करणारी मंडळी कॉपीराइट कायदा-१९५७ चा भंग करत आहेत. अशा लोकांना पोलीस अटक करू शकतात. ‘वॉरंट’खेरीजही त्यांना अटक करता येते. मात्र या विरोधात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ‘पायरेटेड’ पुस्तकांची विक्री करणाऱ्यांना मोकळे रान मिळाले असल्याचेही गवाणकर यांनी या निव्ेादनात म्हटले आहे.
बांधणी, छपाईत फरक
बनावट पुस्तक हुबेहुब मूळ पुस्तकाप्रमाणेच दिसत असल्याने मूळ आणि बनावट पुस्तक कोणते हे पटकन समजत नाही. मात्र पुस्तकाची बांधणी, छपाई, कागद यावरून कोणते पुस्तक‘पायरेटेड’ हे कळू शकते. मुंबईत फोर्ट, चर्चगेट आदी परिसरात रस्ते आणि पदपथावर ही पायरेटेड पुस्तके सर्रास विकली जात आहेत. पुण्यातही अशा पुस्तकांची विक्री होत आहे.
कशी होते पायरसी?
‘पायरेटेड’ पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ मूळ पुस्तकावरून स्कॅन केले जाते. या पुस्तकाच्या छपाईसाठी न्यूज प्रिंटचा वापर केला जातो. या कागदाचा दर्जा आणि छपाईही सुमार असते. या पुस्तकांवर छापील किंमतही मूळ पुस्तकाच्या किंमतीएवढीच छापलेली असते. मात्र छापील किमतीपेक्षा पन्नास टक्के इतकी सवलत देऊन ते विकण्यात येते.