पश्चिम रेल्वेवर विरापर्यंतच्या फलाटांची उंची वाढणार; मध्य रेल्वेवरील ५० स्थानकांमधील कामे प्रगतिपथावर

मोनिका मोरे प्रकरणानंतर फलाट आणि गाडीचे पायदान यांच्यातील जीवघेण्या पोकळीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची पूर्तता करण्यासाठी आता रेल्वेने ऑगस्ट २०१७चे उद्दिष्ट ठेवले आहे.

पश्चिम रेल्वेने आपल्या अखत्यारीतील विरापर्यंतच्या सर्व स्थानकांची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला असून मध्य रेल्वेवरही ५० स्थानकांमधील फलाटांची कामे वेगाने सुरू आहेत. आता पुढील आठ महिन्यांमध्ये ही कामे पूर्ण होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

उपनगरीय रेल्वेमार्गावर दरवर्षी रुळांची उंची या-ना त्या कारणाने वाढवली जाते. त्यामुळे रुळांवर धावणारी गाडी आणि फलाट  यांच्यातील अंतर वाढत असते. फलाट  आणि गाडीचे पायदान यांच्यातील पोकळीत पडून अनेक प्रवाशांचा मृत्यू होण्याच्या, तर काही जण गंभीर जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत.

तीन वर्षांपूर्वी घाटकोपर स्थानकात गाडी पकडताना फलाट आणि गाडीचे पायदान यांच्यामधील पोकळीत पडून मोनिका मोरे या तरुणीला हात गमवावे लागले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने या जीवघेण्या पोकळीची दखल घेत ही पोकळी दूर करण्याचे आदेश रेल्वेला दिले होते.

विरार ते डहाणू यांदरम्यान अनेक स्थानकांवरील फलाटांची उंची कमी आहे. हे काम पुढील टप्प्यात हाती घेण्यात येणार आहे, असेही पश्चिम रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर मध्य रेल्वेनेही ५० स्थानकांमधील फलाटांची उंची वाढवण्याचे काम ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

ऑगस्टपर्यंत कामे पूर्ण होणार

मध्य तसेच पश्चिम रेल्वेमार्गावर फलाटांची उंची वाढवण्याचे काम सुरू झाले आहे. सर्व स्थानकांमधील सर्व फलाटांची उंची ८४०वरून ९०० मिमी करण्यासाठी रेल्वेने ऑगस्ट २०१७पर्यंतची कालमर्यादाही मागितली होती.

फलाटांची उंची वाढवण्याचे काम रात्रीच्या वेळी सर्व वाहतूक थांबल्यानंतरच करावे लागत असल्याने एवढा वेळ लागणार असल्याचे मध्य रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. तरीही काम करत पश्चिम रेल्वेने आपल्या अखत्यारीतील ९२ फलाटांची उंची वाढवली असून उर्वरित ५२ फलाटांची उंची वाढवण्याचे काम सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.