न्यायालयीन आदेशांचे कारण देत पालिकेनेच खेळणी व हिरवळ हटवली

ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे नाव देण्यावरून चर्चेत आलेले विलेपार्ले येथील विशेष मुलांसाठीचे उद्यान स्थानिक राजकारणी आणि पालिकेच्या उदासीनतेचे बळी ठरले आहे. गेल्या वर्षीच्या न्यायालयीन सुनावणीचा मुद्दा उकरून काढीत पालिका प्रशासनाने या उद्यानातील खेळणी आणि हिरवळही उचलून नेली आहे. उद्यानाच्या विकासासाठी वर्षभरात ५० लाख रुपयांहून अधिक खर्च झाला असताना पालिकेला नेमकी आता कोणती उपरती झाली, असा प्रश्न पार्लेकरांना पडला आहे.

विकास आराखडय़ात उद्यानाचे आरक्षण असलेला विलेपार्ले येथील मालवीय रस्त्यानजीकचा भूखंड क्रमांक ११२ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी येथील स्थानिक नगरसेवकांनी अनेक वर्षे प्रयत्न केले होते. २०१३ मध्ये न्यायालयात १० कोटी रुपये भरून पालिकेने यातील काही जमीन संपादित केली. या भागातील एका जागेवरील वाद न्यायप्रविष्ट होता. तो वगळून इतर जागेवर उद्यानाचा विकास करण्यासाठी गेल्या आर्थिक वर्षांत उद्यान विभागाकडून आर्थिक तरतूद करण्यात आली. या परिसरात इतर उद्यान नसल्याने पहिल्या दिवसापासून मुलांमध्ये हे उद्यान प्रसिद्ध झाले.  स्थानिकांचा आग्रह आणि स्वयंसेवी संस्थेच्या प्रयत्नांमुळे गेल्या महिन्याच्या १४ तारखेला उद्यानाला महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे यांचे नाव देण्यात आले. पुलंचे वास्तव्य असलेल्या परिसरात त्यांच्याच नावाने खुल्या झालेल्या या उद्यानात मुलांची गर्दीही होत होती. परंतु, अवघ्या महिन्याभरात कायदेशीर बाबींचे कारण पुढे करीत या उद्यानातील खेळणी व हिरवळही उचकटून नेण्यात आली.

उद्यानातील दोन भागांबाबत न्यायालयात वाद होता. त्यामुळे इतर जागेवर उद्यानाचे काम सुरू करण्यात आले. या संपूर्ण उद्यानाची जागा ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश न्यायालयाने २०१६ मध्ये दिल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. उद्यान विभाग किंवा वॉर्ड अधिकाऱ्यांकडून आम्हाला त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. मात्र जागा ‘जैसे थे’ ठेवण्यासाठी उद्यानातील सर्व खेळणी व हिरवळ काढून टाकण्यात येत आहे, अशी माहिती स्थानिक नगरसेविका ज्योती अळवणी यांनी दिली.

‘या जागेवरील ताबा मिळवण्यासाठी पालिकेकडून १० कोटी रुपये भरण्यात आले होते. त्यानंतरही न्यायालयाने आदेश दिले तर गेल्या वर्षी उद्यानाचा विकास सुरू करून ५० लाख रुपये खर्च का करण्यात आले,’ असा सवाल माजी नगरसेवक चंद्रकांत पवार यांनी केला आहे.

यासंदर्भात पालिकेचे उद्यान अधिक्षक डॉ. जीतेंद्र परदेशी यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र या विषयावर त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

घडले-बिघडले..

  • मे २०१३ मध्ये संपादित (भूखंड क्रमांक ११२) जागेचा ताबा नगर भूमापन अधिकाऱ्याकडे देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्य़ाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांनी संबंधित जागेवर हक्क सांगणाऱ्या व्यक्तींना २८ मे २०१३ रोजी उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे त्यांना देय असलेली रक्कम न्यायालयात भरण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानंतर महापालिकेने १० कोटी रुपये न्यायालयात भरले होते.
  • २८ मे २०१३ रोजी स्थानिक रहिवासी, पोलीस यांच्या उपस्थितीत हा भूखंड पालिकेच्या ताब्यात देण्यात आल्याचे पत्रक भाजपकडून रहिवाशांना वाटण्यात आले.
  • या उद्यानाला साहित्यिक पु. ल. देशपांडे नाव देण्यात यावे, अशी इच्छा पार्लेकरांनी व्यक्त केली. मात्र स्थानिक नगरसेवकांकडून याबाबत कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. या वादामुळे उद्यानाचे उद्घाटन रखडले.
  • विलेपार्ले येथील उत्तुंग संस्थेचे माधव खाडिलकर यांनी महापौरांना पत्र लिहून उद्यानाला पु. ल. देशपांडे यांचे नाव देण्याची विनंती केली. त्यानुसार बाजार व उद्यान समितीच्या १४ जूनच्या बैठकीत या उद्यानाला ‘महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे’ हे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • दोन महिने बंद असलेल्या उद्यानात महापौरांच्या हस्ते वृक्षारोपण करून ते मुलांसाठी खुले करण्यात आले. मात्र त्यानंतर महिन्याभरातच महापालिकेकडून हे उद्यान बंद करण्यात आले.