पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबतच भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचेही मोदींनी कौतुक केले आहे. सचिनने अर्जुनसह ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानात सहभाग घेतला होता. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. यावेळी सचिन तेंडुलकर आणि आदित्य ठाकरेंनी हाती झाडू घेऊन साफसफाई केली. त्यामुळेच पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले आहे.

आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी आज सकाळी मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात साफसफाई केली. यावेळी आदित्य ठाकरेंनी हातात झाडू घेत परिसरात झाडलोड केली. याबद्दल मोदींनी आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर या दोघांचेही आभार मानत कौतुक केले. ‘माझा तरुण मित्र आदित्य ठाकरेने स्वत:हून स्वच्छता हीच सेवा या अभियानात सहभाग घेतला. याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी ट्विटरवर आदित्य ठाकरेंचे कौतुक केले.

आदित्य ठाकरेंसोबतच मोदींनी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचेही कौतुक केले. ‘सचिनचा स्वच्छ भारत अभियानातील सहभाग कायम असून ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. त्याच्या या पुढाकारामुळे देशातील लोकांना प्रेरणा मिळेल,’ असे म्हणत मोदींनी सचिनचे कौतुक केले.

आदित्य आणि सचिननेही ट्विट करुन स्वच्छतेचा संदेश दिला. याशिवाय मोदींनी अर्जुन तेंडुलकरचेही कौतुक केले. ‘स्वच्छता हीच सेवा या अभियानातील अर्जुन तेंडुलकरसापख्या तरुणांचा प्रतिसाद वाढतो आहे. हे नक्कीच आनंददायी असून आपली युवाशक्ती देश नक्कीच स्वच्छ करेल,’ अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.