महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये येणाऱ्या परप्रांतीय लोंढ्यांमुळेच  शहरांची अवस्था बकाल झाली आहे अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका जाहीर मुलाखतीच्या दरम्यान केली आहे. दादरमधील ब्राह्मण सेवा मंडळाने, गणेशोत्सवाच्या ९२ व्या वर्षाचे औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक मुलाखत आयोजित केली होती, या मुलाखतीत पत्रकार संदीप प्रधान आणि उदय तानपाठक यांनी विचारलेल्या प्रश्नांना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत उत्तरे दिली.

मुंबईत नुकत्याच झालेल्या पावसाबाबत आणि प्रशासकीय अनास्थेबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. याच प्रश्नाचे उत्तर देताना राज ठाकरे यांनी परप्रांतीय लोंढ्यांचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. मी आजवर केलेली अनेक भाषणे काढून बघा, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या शहरांमध्ये येणारे परप्रांतीय कोण आहेत? कुठून येत आहेत? पोलिसांना त्यांची माहिती आहे का? व्होटबँकेचे राजकारण करण्यासाठी असे लोंढे आणले जातात आणि ते इथेच राहतात, मग शहरे बकाल होणारच. टक्केवारीचे राजकारण जोवर संपत नाही तोवर शहरांची अवस्था बिघडणारच, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

शहरांमध्ये पाणी साठले, शहरे बकाल झाली की मग आपल्याला व्यवस्थेच्या गोष्टी आठवत असतात. ठाणे हे एकमेव शहर असे आहे जिथे परप्रांतीय लोक सर्वात जास्त प्रमाणावर येतात आणि इथून मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये जातात असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

पायाभूत सुविधांवर आपल्याकडे खर्च का केला जात नाही? मुंबई, पुण्यातल्या गल्ल्या आणि रस्ते जरा बघा तिथे जागाच उरलेली नाही. शहराच्या क्षेत्रफळाच्या नियमाप्रमाणे शहरात १५ टक्के रस्ते असले पाहिजेत. पुण्यात आता फक्त ७ टक्के रस्ते उरले आहेत. याची जबाबदारी कोण घेणार? असेही त्यांनी विचारले आहे.

मुख्यमंत्र्यांवरही टीका

महापालिकांकडे निधी नाही, मुख्यमंत्री निवडणुकांच्या वेळी प्रचाराला जातात, ६ हजार कोटी देऊ, १० हजार कोटी देऊ अशी आश्वासने देतात. कोणत्या शहराला मिळाले पैसे? काय सुविधा झाल्या? असेही प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. निवडणुकांसाठी जनतेला किती काळ फसवणार? असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणाबाजीवरही टीका केली आहे.

पंतप्रधानांनी महानगरपालिका आणि मंत्रालयात स्वच्छता मोहिम राबवावी
स्वच्छ भारत अभियानाचा नारा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महापालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी असे झाल्यास शहराची अवस्था सुधारेल यात शंकाच नाही असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले. हे स्वच्छता अभियान राबविण्याऐवजी पंतप्रधान इतर पक्ष संपवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेच राजकारण आहे असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.