स्थळ – कवी-गीतकार गुलजार यांचे निवासस्थान
वेळ – ऊनकलत्या दुपारची
निमित्त – ‘लोकसत्ता’च्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे
हीसुद्धा एक बातमीच आहे, की गुलजारसाब यांचा नवा चित्रपट येतोय. त्यानिमित्ताने ते सकाळीच यशराज स्टुडिओमध्ये गेले होते. दुपारी त्यांच्या हस्ते ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकाचे प्रकाशन होणार होते.    
सिनेमातील मंडळी, अडकली की अडकली. ते वेळेवर येतात की नाही ही धाकधूक होतीच; पण नेमके तीनच्या ठोक्याला ते आले. तोच सफेद सदरा-पायजमा. चेहऱ्यावर नेहमीची प्रसन्नता..
मग भरभरून आगतस्वागत, चहापाणी, प्रकाशनाचा औपचारिक कार्यक्रम. हे सगळे झाले आणि मग ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, गुलजारांचे स्नेही अरुण शेवते आणि गुलजार यांच्या मनमोकळ्या गप्पांची, काव्यशास्त्रविनोदाची मैफलच रंगली..
बोलता बोलता एक प्रश्न आला. म्हणजे होते काय, की सर्वसाधारणपणे वय वाढले, की माणूस कालबाह्य़ होत राहतो, कंटाळवाणा होत राहतो. त्याचे सगळे सूर मग किरकिऱ्या पट्टीतच लागतात. जुन्या जमान्यातले एक संगीतकार आहेत. जाईल तेथे त्यांचे एकच गाणे, की हल्ली संगीतच राहिलेले नाही, आमचा काळ कसा थोर होता, तेव्हाचे संगीत कसे अभिजात होते वगैरे. तर हे कसे?
गुलजारांचे उत्तर खूप सुरेख होते. त्यांनी उलटाच सवाल केला. आमचा काळ म्हणजे काय? तेव्हा प्रवासाला वेळ लागायचा. अनेक गोष्टींचा अभाव होता. आता प्रगती होतेय. नवीन सर्जनशील जग निर्माण झालेले आहे. ही तरुण मंडळी आजच्या काळाशी सुसंगत अशी दर्जेदार निर्मिती करीत आहेत.. या नव्या जगापासून मी स्वत:ला नाही दूर ठेवत. त्याने मला ताजेपणा येतो..
काळ बदलला आहे, हे समजून घेतले पाहिजे. पूर्वी निवांतपणा असायचा तेव्हाच्या कविता पाहा. तशा ऐसपैस असायच्या. आता तसे नाही. आता गती आली आहे. त्यात कविता बदलल्या, तर गैर ते काय?
पूर्वी कविता विलंबित ख्यालात चालायच्या. आता तिरकिटधा अशी गती आली आहे. त्याचे प्रतिबिंब कलेमध्ये उमटले, तर काय अयोग्य आहे?
पण माणसे गेलेल्या काळाला धरून बसतात, असा विचार करतात, त्यामुळे ते स्वत:ला दूर ठेवतात सगळ्यापासून. अशी माणसे इतरांसाठीच नाही, तर स्वत:साठीही कंटाळवाणी होतात.. त्यांचा जीवनरस संपून जातो. मी तुमच्यासारख्या तरुण मंडळींशी त्यांच्या पातळीवर जाऊन गप्पा मारतो म्हणून मला कधीच तुटल्यासारखे वाटत नाही..
यातून स्वाभाविकच गप्पांची गाडी वळली ती आजचे संगीत, संस्कृती या बाबींकडे. पाश्चात्त्यांचा मोठा परिणाम आपल्या संस्कृती आणि संगीतावर होत असल्याची ओरड तशी नेहमीचीच. गुलजार यांचे याबाबतचे मत अगदी वेगळे आहे. ते म्हणाले, याची भीती बाळगण्याचे काही कारणच नाही. आक्रमणे होतात; पण आपली पुण्याई, आपल्याकडचे संचित एवढे मोठे आहे, की आपल्याकडे येता येता या बाहेरच्या गोष्टी आपल्याच होऊन जातात. त्याची अशी भीती नकारात्मक मानसिकतेतून येते. माझी मानसिकता तशी नाही. जग मला पूर्वी जेवढे सुंदर वाटत होते तेवढेच आताही वाटते..
गुलजार यांच्या काव्याचा सुवास नित्य ताजा असतो त्याचे हे रहस्य.
या मानसिकतेमुळेच हा कवी अजूनही ऊर्जावान आहे. नवा चित्रपट तर येतोच आहे त्यांचा, पण एक कवितेचा एक मोठा प्रकल्पही त्यांनी हाती घेतलाय. हिंदीच्या समान धाग्यामध्ये सर्व भारतीय भाषांतील कविता जोडण्याचा हा महाप्रकल्प आहे. विविध भाषांतल्या कवितांचा हिंदीमध्ये अनुवाद करण्याचे काम ते करीत आहेत. त्याचा महत्त्वाचा भाग असा, की ही सगळी समकालीन कविता आहे. त्यामुळे या खंडातून एकाच घडीला सर्व भाषांतील काव्यक्षेत्रात काय चाललेय हे कळणार आहे..
हलकेच चष्म्यांची काडी ओठांत धरून ते म्हणाले, कवितेने इतके काही दिलेय मला, त्याची परतफेड करण्याचा हा प्रयत्न आहे. कर्तव्याच्या आनंदातून हे काम मी करतो आहे. बोलताना मधूनच ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकावरून नजर फिरविणे सुरूच होते.
या अंकात गुलजार यांच्या कवितांचा एक खास विभाग आहे. नजरेला तो पडला आणि त्यांची दृष्टी काही क्षण तेथे थबकलीच..
कवीला कविता न्याहाळणे-वाचणे याच्याइतके सुख अन्य कशातही नसते!
(विशेष प्रतिनिधी)