आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कविता आणि कविता हाच ज्यांच्या अभ्यासाचा, चिंतनाचा विषय होता, कविता हाच ज्यांच्या आयुष्याचा श्वास आणि ध्यास होता त्या शंकर वैद्य यांना अखेरची सलामी दिली गेली तीदेखील कवितांनीच! या शब्ददरवळीने शीव स्मशानभूमीतील वातावरणही भारावले होते.  
मंगळवारी दुपारी शीव स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत वैद्य यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा मराठीतील काही कवी व साहित्यिकांनी आपल्या लाडक्या ‘सरां’ना कविता गाऊन आणि त्यांच्या आठवणींना उजळा देऊन त्यांना आदरांजली वाहिली.
कवी आणि राजकीय नेते अर्जुन डांगळे यांनी वैद्य यांच्या सोबतच्या जुन्या आठवणींना उजळा देताना प्रा. शंकर वैद्य हे जाती-धर्माच्या पलीकडला निर्मळ मनाचा माणूस होता, असे सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वि. शं. चौघुले यांनी त्यांच्यासमवेतच्या जुन्या आठवणी जागविल्या. दुर्गेश सोनार यांनी ‘आई’ही कविता सादर केली. तर कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांनी वैद्य यांची ‘श्रावणसरी’ ही कविता सादर केली. कवितेतील
मेघ सावळा फुलरुनी या
विरघळला अंबरी
कलत्या रवीचे उन विंचरित
आल्या श्रावणसरी..
या ओळी ऐकल्यानंतर प्रा . वैद्य यांच्या निधनाने मराठी साहित्यातील मेघ सावळा अंबरी विरघळला असल्याची भावना उपस्थितांच्या मनात उमटली आणि काही क्षण सर्वच निश:ब्द झाले.
निळकंठ कदम हे वैद्य ‘सरां’चा विद्यार्थी म्हणून आपल्या सरांविषयी बोलले आणि ते उत्तम प्राध्यापकही कसे होते, ते त्यांनी सांगितले. प्रा. मोहन पाटील, प्रशांत मोरे यांनी आठवणी-कविता सांगून तर कवी नलेश पाटील यांनी ‘दर्शन’ या काव्यसंग्रहाची अर्पण पत्रिका वाचून आपली श्रद्धांजली वाहिली. अशोक नायगावकर आणि अरुण म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले.
गायिका योजना शिवानंद यांनी संत जनाबाई यांचा अभंग गाऊन शंकर वैद्य यांच्या अखेरच्या प्रवासाची भैरवी केली आणि प्रत्येकाने सरांच्या आठवणी मनात जागवत त्यांना अखेरचा निरोप दिला..