‘खेळाडूं’च्या सुरक्षिततेसाठी कठोर नियमावली आखण्याचे पोलिसांचे संकेत
अधिकृतपणे उपलब्ध होण्याआधी देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘पोकेमॉन गो’ या मोबाइल गेमचे संभाव्य धोके पाहून मुंबई पोलिसांनीही आतापासूनच तयारी सुरू केली आहे. हा गेम खेळण्याच्या नादात दुर्लक्षामुळे होणारे अपघात वा अन्य दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई पोलीस ट्विटर तसेच अन्य समाजमाध्यमांतून जनजागृती करणार असून ‘खेळाडूं’साठी कठोर नियमावलीही आखण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ही नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी ‘पोकेमॉन गो’ भर रस्त्यात अथवा गर्दीच्या ठिकाणी खेळण्यावर निबंध आणण्यात येऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
जगभरात ‘पोकेमॉन गो’ या खेळाने आबालवृद्धांना अक्षरश: वेड लावले आहे. साहजिकच भारतातही त्याचे लोण पोहोचले आहे. अधिकृतपणे उपलब्ध नसलेला हा गेम आताच मागील दाराने अनेकांच्या मोबाइलमध्ये पोहोचला आहे. त्यातच गेल्या आठवडय़ात मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘पोकेवॉक’ या कार्यक्रमानंतर या गेमच्या खेळाडूंमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे या खेळाचा ज्वर टिपेला पोहोचत असतानाच त्याच्या दुष्परिणामांचीही चर्चा मोठय़ा आवाजात सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई पोलिसांनीही आता ‘पोकेमॉन गो’बाबत खबरदारी घेण्याची ठरवले आहे.
‘कोणी कोणता खेळ खेळावा हे पोलीस सांगू शकत नाहीत. पण तो खेळताना कोणती खबरदारी घ्यावी, हे नक्कीच सांगू शकतात. हा खेळ खेळणाऱ्याला पूर्णपणे त्यात गुंतवून टाकणारा असल्याने सार्वजनिक ठिकाणी खेळताना त्यामुळे खेळाडू आणि इतरांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे,’ असे मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते, उपायुक्त अशोक दुधे यांनी स्पष्ट केले. खेळाडूंच्या सुरक्षिततेबरोबरच इतरांची सुरक्षा, वाहतूक आणि अपघात टाळणे यालाही पोलिसांकडून प्राधान्य देण्यात येत असून त्यासाठी जनजागृतीसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या ट्विटरवरून याविषयी जागृती करण्यात येत असून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना गस्तीदरम्यान सार्वजनिक ठिकाणी खेळ खेळताना दिसल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी जाऊन खेळण्यास सांगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी याबाबतची नियमावली जाहीर केली नसली तरी रस्ते तसेच गर्दीच्या ठिकाणी हा गेम खेळण्यास मनाई करण्यात येण्याची शक्यता आहे. खासगी ठिकाणे, मैदाने, उद्याने किंवा सुरक्षित परिसरात ‘पोकेमॉन गो’ खेळण्यास मुभा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सुरुवातीला रस्ते किंवा गर्दीच्या ठिकाणी हा खेळ खेळणाऱ्यांना समज देण्यात येईल. मात्र त्यात सुधारणा न झाल्यास कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.