तरुणाई भरकटण्याचा पोलीस, मानसोपचारतज्ज्ञांचा इशारा

जगभरातील आबालवृद्धांना वेड लावणाऱ्या ‘पोकेमॉन गो’ या खेळाचे लोण भारतातही येऊन ठेपले आहे. कशाचेही भान न ठेवता खेळाच्या नादात इकडेतिकडे भरकटणारी तरुणाई आता रस्तोरस्ती दिसू लागली आहे. वाहतूक, खड्डे, खाचखळगे यांचे भान ठेवता खेळात रमणाऱ्या तरुणाईला खुद्द पोलिसांनीच धोक्याचा इशारा दिला आहे. त्यातच आज, शनिवारी आणि उद्या, रविवारी अनुक्रमे चर्चगेट आणि अंधेरी येथे पोकेवॉकचे आयोजन करण्यात आले आहे.

जपानी कंपनी नितांदो यांनी विकसित केलेला ‘पोकेमॉन गो’ हा खेळ भारतात अधिकृतरीत्या उपलब्ध झाला नसला तरीही त्याचे ‘पायरेटेड व्हर्जन’ डाऊनलोड करून खेळणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. हा खेळ केवळ वेड लावणारा ठरू शकतो, अशी भीती मानसोपचारतज्ज्ञांकडून व्यक्त  होत आहे. देशात तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यापूर्वी मुले कॉमिक्स वाचत असत. त्यानंतर व्हिडीओ गेम आणि भ्रमणध्वनीच्या आगमनाने मैदानी खेळापासून मुले दुरावली, कारण हे खेळ मुलांना आभासी जगात घेऊन जातात आणि त्याचे सवयीमध्ये रूपांतर होते. त्याचाच एक भाग म्हणजे पोकेमॉन खेळामुळे तरुण आभासी जगामध्ये अडकून राहतील, अशी भीती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी व्यक्त केली. हा खेळ खेळणाऱ्याचा भौतिक जगाशी संबंध तुटतो, कारण या खेळात मुलांच्या मेंदूतील अनेक अवयव जागृत करण्याची गरज असते. यात एकाग्रता, हालचाल, चपळता, अचूकता अशा अनेक क्रिया कराव्या लागतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भ्रमणध्वनीच्या स्क्रीनकडे पाहातच चालत जावे लागत असल्यामुळे खेळताना मुलांना आजूबाजूचे भान राहत नाही. यामुळे इतर संकटांनाही आमंत्रण देणारा हा खेळ ठरेल, असा इशारा डॉ. बर्वे देतात. दरम्यान, घराबाहेर भ्रमणध्वनीच्या स्क्रीनवर टक लावून चालत राहिल्याने अपघाताला आमंत्रण मिळू शकते, अशी भीती पोलिसांकडूनही व्यक्त  करण्यात येत आहे. मरिन ड्राइव्हसह काही परिसरांत मुले पोकेमॉन शोधताना दिसत असून हे लोण असेच वाढत गेले तर त्याचा फटका वाहतुकीला तर निश्चितच बसेल पण त्याचबरोबर या खेळाडूंच्या जीवितालाही धोका ठरू शकेल, असेही मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

  • शनिवार आणि रविवारी मुंबईत दोन ठिकाणी पोकेवॉकसाठी परवानगी मागण्यात आली आहे. या पोकेवॉकदरम्यान कोणतीही व्यक्ती रस्त्यावर येऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त आणि निगराणी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या खेळाचे लोण असेच वाढत गेले तर निश्चितच खेळणाऱ्यांसाठी काही बंधने घालावी लागतील.
    • मिलिंद भारंबे, वाहतूक पोलीस सहआयुक्त, मुंबई.

 

 ‘पोकेमॉन गो’ची विधिमंडळात स्वारी

मुंबई:  छोटी मुले, महाविद्यालयीन युवक इतकेच काय तर नोकरदार वर्गालाही वेड लावणारा आणि प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘पोकेमॉन गो’ने शुक्रवारी विधिमंडळातही प्रवेश केला. देश आणि राज्यातील महत्वाच्या घडामोडींची दखल घेणाऱ्या विधिमंडळात आज पोकेमॉनच्या वेडामुळे  निर्माण झालेल्या धोक्याबाबत विधान परिषदेत चिंता व्यक्त करण्यात आली. मोबाइलवर खेळल्या जाणाऱ्या या गेममुळे अनेकांना वेड लागले असून गेमच्या नादात अनेकांनी जीव धोक्यात घातले आहेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना या गेमबाबत दक्षतेच्या सूचना द्याव्यात अशी मागणी शिवसेनेच्या डॉ. नीलम गोरे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे केली.अरिझोना येथील एका शाळेने विद्यार्थ्यांना पोकेमॉन गो हा गेम खेळताना दक्षता घेण्याबाबत ई-मेल द्वारे सूचना दिल्याचे समजते, असेही डॉ. गोरे यांनी यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणले. त्यामुळे शासनाने या गेमचे धोके लक्षात घेऊन  विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या खेळाबाबत दक्षता घेण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली.