हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना तुरुंगांतून संचित रजेवर सुटून फरारी झालेल्या एका कैद्यास पोलिसांनी नाटय़मयरित्या पाठलाग करून अटक केली. शब्बीर उर्फ खड्डा असे त्याचे नाव असून मोबाइलमधील आयईएमआय क्रमांक बदलणाऱ्या टोळीतील हा आरोपी आहे.
 २००७ मध्ये कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोन्याच्या दागिन्यांची ने-आण करणाऱ्या व्यक्तीची हत्या करून लुटल्याप्रकरणी सात आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यापैकी शब्बीर हा नाशिक कारागृहात शिक्षा भोगत होता. २० जानेवारी २०१३ रोजी तो तीन महिन्यांच्या संचित रजेवर बाहेर आला होता. तेव्हापासून तो फरार होता.
शब्बीर हा कांदिवलीच्या लालजीपाडा येथे लपला असल्याची माहिती गुन्हे शाखा ११ च्या पोलीस हलावदार नाईक यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक शरद झिने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विचारे, कोंडे आणि बुगडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी घराला घेराव घातला. तो पळून पळून गेला असता या पथकाने नाटय़मयरित्या पाठलाग करून त्याला अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सावंत यांनी दिली.