बॅलार्ड पिअर येथील प्राप्तिकर खात्याच्या कर्जवसुली लवाद या सरकारी कार्यालयात बॉम्ब असल्याचा निनावी दूरध्वनी करून खळबळ उडवून देणाऱ्या इसमास मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अलोक तन्ना (२९) असे या आरोपीचे नाव असून तो इस्टेट एजंट आहे. २६ जुलै रोजी या कार्यालयात होणाऱ्या फ्लॅटचा लिलाव थांबविण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
बॅलार्ड पिअर येथील सिंधिया हाऊस या इमारतीत प्राप्तिकर विभाग तसेच कर्जवसुली लवादाचे कार्यालय आहे. बँका आणि इतर आर्थिक संस्थांनी जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव या कार्यालयामार्फत केला जातो. २६ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर एक निनावी दूरध्वनी आला होता. प्राप्तिकर भवन आणि या कर्जवसुली लवाद कार्यालयात बॉम्ब असल्याचे या अज्ञात व्यक्तीने सांगितले होते. परिसर बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथकाच्या मदतीने पिंजून काढण्यात आला. अखेर हा दूरध्वनी खोटा असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणाचा तपास करून गुन्हे शाखा ११ च्या पथकाने कांदिवलीच्या रघुलीला मॉल परिसरातून आलोक तन्नास अटक केली.  लिलावात फ्लॅट आपल्याला मिळणार नाही हे त्याच्या लक्षात आले ही थांबविण्यासाठी त्याने हा बॉम्ब असल्याचा दूरध्वनी केला होता. गुन्हे शाखा ११ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, परशुराम साटम, मनोहर हारपुडे आणि पोलीस शिपाई अशोक कोंडे यांनी मोबाइल टॉवर लोकेशनवरून आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. कॉल केल्यानंतर त्याने मोबाइल आणि सिमकार्ड नष्ट केले होते. पण हा कॉल कांदिवलीच्या रघुलीला मॉलजवळून केल्याचे स्पष्ट झाले होते. त्या एवढय़ाच धाग्यावरून आरोपीला पकडल्याचे सावंत यांनी सांगितले.