सहकारी महिलेकडून मालीश करून घेतानाची एका डॉक्टरची चित्रफीत गुंडाच्या हाती लागली आणि त्यांच्याकडून खंडणीसाठी धमक्यांचे सत्र सुरू झाले. बदनामीच्या भीतीने डॉक्टरने प्रसंगी कर्ज काढून खंडणी दिली. परंतु, खंडणीखोरांची मागणी वाढू लागताच त्याने पोलिसांकडे धाव घेतली..

वर्षभरापूर्वीचा प्रसंग. ठाणे आणि उल्हासनगर परिसरात एक ६६ वर्षीय डॉक्टर दवाखाना चालवितो. या दवाखान्यात अर्धागवायू, सांधेदुखी, मान व कंबरदुखी या आजारांवर औषधोपचार करण्यात येतात. एकेदिवशी दुपारी डॉक्टर ठाण्यातील दवाखान्यात अशाच रुग्णांवर औषधोपचार करीत होते. या कामात व्यस्त असतानाच त्यांच्या परिचित असलेला सुंदर शेट्टी हा दवाखान्यात आला. त्याच्यासोबत एक महिला होती. डॉक्टरने त्याची भेट घेऊन विचारपूस केली. त्यावेळेस ‘तुमची एका महिलेसोबत अश्लील चाळे करताना काढलेली चित्रफीत माझ्याकडे आहे आणि ती मीडियाला, सामाजिक संस्थेला देऊन दवाखाना बंद पाडेन’ अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर त्याने ती चित्रफीत डॉक्टरला दाखविली. तसेच हे प्रकरण मिटविण्यासाठी त्याने ५० लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम त्याने सोबत आलेल्या महिलेकडे देण्यास सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे डॉक्टर भेदरले आणि बदनामीच्या भीतीपोटी ते पैसे देण्यास तयार झाले. ठरल्याप्रमाणे काही दिवसांत त्यांनी ३० लाख रुपये सुंदरसोबत आलेल्या महिलेला दिले. पैसे देऊ केल्याने पीडित डॉक्टरने सुटकेचा नि:श्वास टाकला होता.

सहा महिन्यांनंतर त्यांच्या परिचित असलेला नरेश बळीराम पाटील हा दवाखान्यात आला. त्याने डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्याशी बातचीत केली. त्यामध्ये नितीन विनायक भोईर यांच्या कार्यालयात गँगस्टर आले असून तुम्हाला तिथे बोलाविले असल्याचा निरोप त्याने दिला. त्यामुळे डॉक्टर नितीनच्या कार्यालयामध्ये गेले. तिथे नितीन याच्यासोबत युसूफ, धर्मा आणि अजिम हे तिघे बसले होते. हे तिघेही छोटा राजन आणि अश्विन नाईक टोळीचे सदस्य असल्याची ओळख नितीनने करून दिली. तसेच हे तिघे सर्वाकडून खंडणी गोळा करतात आणि खंडणी दिली नाहीतर जिवे मारतात, अशी भीती दाखविली. या तिघांची ओळख करून देण्यामागे नेमका काय उद्देश आहे, या विचाराने डॉक्टर संभ्रमावस्थेत होते. त्याच वेळी युसूफ याने डॉक्टरची ती मोबाइलमधील चित्रफीत दाखविली आणि ती प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. डॉक्टरने नितीनसोबत चर्चा केल्यानंतर खंडणीची रकम एक कोटीवरून ५० लाख करण्यात आली. त्यापैकी दहा लाख रुपये डॉक्टरने त्यांना दिले. त्यानंतर उर्वरित रक्कम देत डॉक्टरने ५० लाख रुपयांची खंडणी दिली आणि हे प्रकरण मिटविण्यासाठी नितीनला दहा लाख रुपये दिले. त्यानंतरही पंधरा दिवसांनी तिघांनी पुन्हा त्यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले. या तिघांना खंडणीची रक्कम देण्यासाठी डॉक्टरकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी त्यापैकी काही रकमेसाठी बँकेतून कर्ज काढले होते. इतके पैसे दिल्यानंतरही तिघांनी पुन्हा एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या संपूर्ण प्रकाराला कंटाळलेल्या डॉक्टरांनी अखेर ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेकडे धाव घेतली आणि त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि साहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या पथकाने युसूफ, धर्मा, अजिम आणि नितीन या चौघांना अटक केली आणि त्यांच्याकडे असलेल्या त्या चित्रफितीबाबत चौकशी सुरू केली. त्यामध्ये पुढे आलेल्या धक्कादायक माहितीमुळे पोलीसही चक्रावले.

पीडित डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये पाच महिला कंपाऊंडर म्हणून काम करायच्या. त्यापैकी एका महिलेला कामाच्या कारणावरून डॉक्टर नेहमीच ओरडायचे. सततच्या ओरडय़ामुळे ती अस्वस्थ होती आणि यातूनच तिने डॉक्टरला अद्दल घडवायचे ठरविले. अद्दल घडविण्यासाठी ती संधीच्या शोधात असतानाच तिच्या डोक्यात एक कल्पना आली. वयोमानामुळे डॉक्टराला संधिवाताचा त्रास होता. त्यामुळे अधूनमधून ते दवाखान्यातील महिलांकडून थेरीपी आणि हात व पायाला मॉलीश करून घ्यायचे. याच संधीचा फायदा घेऊन तिने डॉक्टरची मॉलीश करतानाची चित्रफीत मोबाइलमध्ये काढली. ही चित्रफीत तिने पतीला दिली होती आणि त्याने ती मावस भाऊ सुंदरराज शेट्टी याला दिली होती. डॉक्टरविरोधात कारवाई करण्यासाठी त्याने ही चित्रफीत त्याला दिली होती. त्यानंतर सुंदर याने कन्झुमर वेल्फेअर असोशिएशनचे अध्यक्ष दिनेश लालजी राठोड याला दाखविली आणि त्याच्याकडून डॉक्टरला घाबरविण्यासाठी संस्थेच्या लेटरहेडवर अर्ज तयार केला. त्याआधारे त्यांनी ५० लाखांच्या खंडणीची मागणी करून ३० लाख रुपये घेतले. या खंडणीनंतर सुंदर याने ही चित्रफीत अजिमला दाखविली आणि त्याने ती स्वत:कडे ठेवून घेतली. त्याने ती युसूफ, धर्मा आणि नितीनला दाखविली आणि त्यानंतर त्यांनी त्याआधारे ७५ लाखांची खंडणी घेतली, अशी माहिती चौकशीत समोर आली. त्यानंतर पथकाने या प्रकरणातील सर्वाना अटक करून या प्रकरणातून डॉक्टरची सुटका केली.