शीनाच्या हत्येनंतर तिच्या नावाने ई-मेल पाठवणाऱ्या तसेच पत्रव्यवहार करून ती जिवंत असल्याचे भासविणाऱ्याला खार पोलिसांनी अटक केली आहे. इंद्राणीनेच त्याला हे काम सांगून शीना जिवंत असल्याचा बनाव रचला होता.
२४ एप्रिल रोजी शीनाची इंद्राणीने हत्या केली आणि पेणच्या जंगलात मृतदेहाची विल्हेवाट लावली. कुणी शीनाचा शोध घेऊ नये यासाठी ती अमेरिकेत स्थायिक झाल्याचे इंद्राणीने सगळ्यांना सांगायला सुरवात केली होती. शीना जिवंत आहे असे भासविण्यासाठी इंद्राणीने एक युक्ती केली. ज्या ठिकाणी शीना भाडय़ाने घर घेऊन रहात होती त्या घरमालकाला शीनाच्या नावाने पत्र पाठवले आणि भाडेकरार रद्द करून मी यापुढे येणार नाही असे कळवले होते. त्या पत्राखाली शीनाची सही होती.
शीना रिलायन्स मेट्रो कंपनीत सहाय्यक प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होती. हत्येनंतर काही दिवसांनी कंपनीला मेलद्वारे शीनाचा राजीनामा मिळाला होता. त्यामुळे संशय आला नव्हता. हा राजीनामा सुद्धा याच व्यक्तीने शीनाच्या नावाने पाठवला होता. शीनाच्या नावाने पाठवलेले मेल बनावट असून पत्रावरील स्वाक्षरीही नकली आहे. आम्ही या तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
पोलिसांवर कारवाई
शीना बेपत्ता असल्याबाबत तिचा प्रियकर राहुलने खार आणि वरळी पोलीस ठाण्यात कळवले होते. परंतु त्यांनी इंद्राणीकडे जुजबी चौकशी करून पुढील तपास थांबवला होता. पेण पोलिसांनीही मृतदेह सापडल्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला नव्हता. या तिन्ही पोलीस ठाण्यांनी वेळीच तपास केला असता तर शीनाच्या हत्येचा उलगडा आधीच झाला असता. त्यामुळे या पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
चालकपत्नीचा आरोप
दरम्यान, अटकेत असलेला वाहनचालक श्याम राय याच्या पत्नीने तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे. इंद्राणीनेच त्याला अडकविल्याचा आरोप तिने केला आहे.
श्याम राय पत्नी आणि दोन लहान मुलांसह वाकोल्याच्या मोसंबी तबेला येथील दत्त मंदिरासमोरील चाळीत राहतो.