मुंबईतील उपनगरीय रेल्वे लोकलमध्ये माकडांचा धाक दाखवून भीक मागणाऱ्या तीन महिलांना त्यांच्याकडील तीन माकडांसह घाटकोपर स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाने सापळा रचून शनिवारी ताब्यात घेतले. माकडाचा धाक दाखवून प्रवाशांकडून  ही टोळी पैसे उकळत  होती.

छत्रपत्री शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या गाडीत कळवा येथे सकाळी आपल्या माकडांसोबत पूजा रवी घाडगे (२५), भिमाबाई पोरोटे घाडगे (३०) आणि शंकुताबाई सोपान घाडगे (२५) या महिलांच्या डब्यात चढल्या. या तिघींकडे असलेल्या माकडांचा उपद्रव सुरू होता.

याच डब्यात बसलेल्या महिला प्रवासी नूतन गायकवाड यांनी याबाबतची माहिती गाडीच्या गार्डला दिल्यानंतर ही माहिती घाटकोपर येथील आरपीएफ पोलीस चौकीचे अधिकारी ब्रिजेशकुमार यांना देण्यात आली. रेल्वे गाडी घाटकोपर रेल्वे स्थानकात येताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने या तिघींनाही तीन माकडांसह ताब्यात घेतले.

तिन्ही माकडे वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. या महिलांच्या चौकशीअंती त्या या माकडांचा धाक दाखवून डब्यातील प्रवाशांकडून पैसे उकळत होत्या, असे स्पष्ट झाल्याचे आरपीएफचे अधिकारी ब्रिजेशकुमार यांनी सांगितले.