क्षुल्लक वादातून तीन पोलिसांना तरुणांच्या एका गटाने भररस्त्यात बेदम मारहाण केली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी चार तरुणांना अटक केली असून तीन जण फरार झाले आहेत. अटक केलेल्या आरोपींमध्ये एक जण ‘एनएसयूआय’चा मुंबई अध्यक्ष आहे.
 घाटकोपर हवेली पुलाजवळ घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक भूषण पवार गस्त घालत होते. सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी असलेल्या पॉईंटवर साध्या वेषात ते बंदोबस्त घालत होते. त्यावेळी मोटारसायकलीवरून जाणाऱ्या तिघा जणांना त्यांनी हटकले. मात्र त्या तिघांनी पोलिसांनी हुज्जत घालत बाचाबाची करण्यास सुरवात केली. पोलिसांनी आपले ओळखपत्र दाखवले तरी त्यांची हुज्जत सुरू होती.
त्यावेळी त्यातील एकाने आपल्या सहकाऱ्यांना फोन करून बोलावले. त्यानंतर ‘एनएसयूआय’चा मुंबई अध्यक्ष बिपिन सिंग आपल्या चार साथीदारांसह तेथे पोहोचेला. त्या सर्वानी शिंदे आणि पवार यांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यांच्या मदतीला आलेल्या उपनिरीक्षक जनराव यांनाही त्यांनी मारहाण केली. अखेर रात्री दहा वाजता नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या पोलिसांची सुटका केली. यावेळी तीन जण घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी बिपिन सिंग (२४) याच्यासह सुमित सिंग (२१), विकास उपाध्याय (२७) सिद्धार्थ संपत (३०) यांना अटक केली. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण, दंगल आदी विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बिपिन सिंग हा एनएसयूआयचा मुंबई शहर अध्यक्ष आहे.