शहर पोलीस रेल्वेला उपायांबाबत पत्र लिहिणार
सँडहर्स्ट रोड आणि मशीद या स्थानकांदरम्यान रेल्वेमार्गालगतच्या आडोशाला बसून अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आणि प्रसंगी पोलिसांच्या कारवाईलाही न जुमानणाऱ्या नायजेरियन गर्दुल्ल्यांच्या बंदोबस्तासाठी शहर पोलीस कंबर कसत आहेत. दोन दिवसांपूर्वी या गर्दुल्ल्यांविरोधात झालेल्या कारवाईदरम्यान पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. ती लक्षात घेऊन शहर पोलीस आता रेल्वेला काही विशेष उपाय सुचवणार आहेत. याबाबतचे पत्र रेल्वेकडे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सँडहर्स्ट रोड आणि मशीद या दोन स्थानकांदरम्यानच्या पुलाजवळ रेल्वेमार्गालगत नायजेरिन गर्दुल्ले नेहमीच अमली पदार्थाचे सेवन करत असतात. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर येथे मोठय़ा प्रमाणात गर्दुल्ल्यांची संख्या वाढते. याआधी या गर्दुल्ल्यांनी चालत्या गाडीवर दगड मारण्याचे प्रकार घडले होते. दोन दिवसांपूर्वीही शहर पोलिसांनी या गर्दुल्ल्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम आखली होती. मात्र पुन्हा एकदा या गर्दुल्ल्यांनी प्रतिहल्ला चढवत काही पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार करत परिस्थिती आटोक्यात आणली. या पाश्र्वभूमीवर आता शहर पोलिसांनी गर्दुल्ल्यांना आवरण्यासाठी मध्य रेल्वेला काही सूचना करण्याचा निर्णय घेतला आहे. या सूचनांमध्ये वाडीबंदर यार्ड, सँडहर्स्ट रोड स्थानक परिसर येथे मोठे झोत असलेले प्रखर दिवे बसवावे, ही महत्त्वाची सूचना आहे. त्याचप्रमाणे सँडहर्स्ट रोडच्या पुढे पूर्वेकडे संरक्षक भिंतीची उंची वाढवून तारांचे कुंपण घालावे, या परिसरात नियमित गस्त घालण्यासाठी सोय करावी, अशा अनेक सूचना असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या आठवडय़ात हे पत्र रेल्वेकडे पाठवले जाणार आहे.सँडहर्स्ट रोड ते मशीद या दरम्यानच्या परिसराचा सुरक्षा तपासणी अहवाल तयार करणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त मधुकर पाण्डे यांनी दिली. रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस आणि शहर पोलीस यांची एकत्रित मोहीम सातत्याने राबवली जाईल, असेही ते म्हणाले.

सहकार्याचे आश्वासन
शहर पोलिसांनी गर्दुल्ल्यांच्या बंदोबस्तासाठी केलेल्या मागण्यांचा विचार करून त्या मान्य केल्या जातील, असे मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने या गर्दुल्ल्यांचा बंदोबस्त होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे रेल्वे सर्व सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.