पोलीस आयुक्तालयाची मागणी; महापालिका मात्र वाहनतळे उभारण्याच्या विचारात

कायम दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलेल्या मुंबईच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेरून येणाऱ्या मालवाहू वाहनांची तपासणी करण्यासाठी जकात नाक्यांच्या जागा पोलीस दलाला उपलब्ध करून देण्याची मागणी पोलीस आयुक्तांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे. मात्र मुंबईतील वाहूतक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी जकात नाक्याच्या जागांवर सर्व सुविधांनी युक्त अशी वाहनतळे उभारण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे. परराज्यातून आणि महाराष्ट्रातील परगावातून येणारी मोठी प्रवासी वाहने भविष्यात या वाहनतळांवर थांबविण्याचा पालिकेचा मानस आहे.

मुंबईच्या वेशीवर असलेल्या मानखुर्द, दहिसर, ऐरोली, नाशिक महामार्गावरील आनंदनगर, मुलुंड (प.) येथील जुना आग्रा रोडवरील लालबहादूर शास्त्री मार्ग या पाच मोठय़ा जकात नाक्यांसह तब्बल ६४ जकात नाक्यांवर महापालिकेतर्फे जकात वसुली करण्यात येत आहे. वस्तू-सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेली जकात बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या वेशीवर असलेल्या मोठय़ा जकात नाक्यांच्या जागांवर आतापासूनच अनेकांची वक्रदृष्टी झाली आहे. या जागा पदरात पडाव्यात यासाठी काही मंडळींनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलीस दलालाही या जागा हव्या आहेत.

मुंबईबाहेरून येणाऱ्या मालवाहू गाडय़ांची आतापर्यंत जकात नाक्यांवर पालिकेच्या माध्यमातून तपासणी होत होती. जकात भरल्यानंतर या गाडय़ा मुंबईत येत होत्या, परंतु आता जकात नाके बंद झाल्यानंतर मालवाहू गाडय़ांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागणार आहे. या वाहनांची नेमक्या कोणत्या ठिकाणी तपासणी करायची, असाही एक प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी मुंबईच्या वेशीवरील मोठय़ा जकात नाक्यांच्या जागा पोलिसांना उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील शहरांमध्ये स्थान मिळविणाऱ्या आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख बनलेली मुंबई दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने भविष्यात मुंबईत विविध प्रकारचा माल घेऊन येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करावी लागणार  आहे. पण मालवाहू वाहनांची तपासणी करताना वाहतुकीला फटका बसू नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पालिकेने सध्याच्या जकात नाक्यांच्या जागा पोलीस दलाला उपलब्ध कराव्यात, अशी मागणी करणारे पत्र पोलीस आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांना पाठविले आहे. मात्र जकात नाक्यांच्या जागा पोलीस दलाला देण्याबाबत पालिकेने अद्याप विचार केलेला नाही.

परराज्यातून आणि महाराष्ट्राच्या परगावातून मुंबईमध्ये प्रचंड संख्येने मोठी प्रवासी वाहने येत असतात. त्यामुळे मुंबईमधील वाहतुकीवर प्रचंड ताण पडतो. निमुळत्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे ही मोठी प्रवासी वाहने मुंबईच्या वेशीवरच थांबविण्याचा पालिकेचा मानस आहे. या मोठय़ा वाहनांमधून येणाऱ्या प्रवाशांना मुंबईतील इतर भागात जाता यावे यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्याचा विचार सुरू आहे.

जकात नाक्यांच्या जागांची पोलिसांकडून मागणी करण्यात आली आहे. पण त्याचा अद्याप विचार केलेला नाही. मात्र जकात नाक्यांच्या जागांचा पालिकेसाठीच वापर करण्यात येईल. अजोय मेहता, पालिका आयुक्त