अमली पदार्थाची कुख्यात तस्कर शकुंतला उर्फ बेबी पाटणकरला मुंबईतील न्यायालयाने दोन मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने गेल्या बुधवारी पनवेल येथून तिला आणि तिच्या साथीदारांना अटक केली होती.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार धर्मा काळोखे याला सातारा पोलिसांनी अमली पदार्थाच्या तस्करीत अटक केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. काळोखे याच्या पोलीस लॉकर मध्ये १२ किलो एमडी अमली पदार्थ आणि तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचे परदेशी चलन समोर आले होते. त्याला अमली पदार्थ पुरविणारी महिला म्हणून बेबी पाटणकरचे नाव पुढे आले होते. या महिलेला पकडण्यासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने जंग जंग पछाडले होते. पोलिसांची दहा स्वतंत्र पथके कार्यरत असतानादेखील ती पोलिसांना गुंगारा देत होती. दरम्यान समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांना बेबी पाटणकर कुडाळहून खासगी बसने मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली. समाजसेवा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरिष सावंत, पोलीस निरीक्षक जगदेव कालापाड, निशिकांत विश्वकार आदींच्या पथकाने या बसचा माग घेत पनवेल येथे सापळा लावून बसमधूनच बेबी पाटणकरला अटक केली. तिच्यासोबत असणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.