२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हॉटेल ताज येथे एक आयईडी आणि हँडग्रेनेड शोधून शेकडो मुंबईकरांचे जीव वाचवणारा मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकातील मॅक्स या श्वानाचा शुक्रवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. ऑक्टोबर २००४ सालचा जन्म असलेल्या मॅक्सला सहा महिन्यांचा असताना पोलीस दलासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली. सहा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर ऑक्टोबर, २००५ मध्ये मॅक्स पोलीस दलाच्या बॉम्बशोधक व नाशक पथकात दाखल झाला. आपल्या दशकभराच्या सेवेत २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मॅक्सने केलेली कामगिरी उल्लेखनीय होती. हॉटेल ताजमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांनी फेकलेले परंतु, स्फोट न झालेला एक आयईडी आणि हँडग्रेनेड शोधण्यात मॅक्सने मदत केली. मे २०१५ मध्ये मॅक्स सेवेतून निवृत्त झाला होता. तेव्हापासून त्याच्या पुढील सांभाळासाठी फिझा शहांकडे सोपविण्यात आला होता.