ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लवकरात लवकर लागावा, यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या पथकाला मदत करण्यासाठी राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी तपास केलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीची मागणी सीबीआयने राज्य पोलिसांकडे केली होती. गुन्हेगारांना तातडीने अटक व्हावी, यासाठी राज्य सरकारने हे पथक पाठविले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण झाली, तरी अजून हल्लेखोर मोकाट आहेत. त्यामुळे गुन्हेगारांच्या अटकेसाठी सीबीआय व सरकारवरही दबाव वाढत आहे.
पथकामध्ये पुण्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त जी.एस. मडगूळकर, नागपूरचे पोलीस निरीक्षक सतीश देवरे, यवतमाळचे चंद्रकांत घोडके, पुण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण आदींचा समावेश आहे.

‘मारेकऱ्यांना संरक्षण’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निष्क्रिय गृहमंत्री असून त्यांच्या कारकिर्दीत डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांचे मारेकरी कधीच पकडले जाणार नाहीत, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी केला. सत्ताबदल होताच मारेकऱ्यांना संरक्षण मिळाले, असा आरोपही करून राज्य सरकार व भाजप परिवाराबद्दल संशयाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला