गोरेगाव येथील वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस निरिक्षक भारत कुंभार यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. १९८८ तुकडीचे असलेले कुंभार हे दहिसरच्या रावळपाडा येथे पाहात होते. सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुंभार यांना तातडीने बोरिवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती ते मरण पावले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. कुंभार यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
शनिवारी कुर्ला येथे राहणारे आणि विशेष शाखेत काम करणारे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुधीर बेकनाळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच निधन झाले होते.
दरम्यान, रविवारी आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरिक्षक दादासाहेब शेवाळे यांचे कर्करोगाने निधन झाले.