प्रवाशांना दरडावून लूट केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई
लोकमान्य टिळक टर्मिनस येथे लोहमार्ग पोलिसांकडून प्रवाशांना दरडावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार सुरू असल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणातून उघड झाल्याने याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, हे चित्रीकरण किती जुने आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेतील भ्रष्टाचाराचे आगर म्हणून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे पाहिले जाते. इस्थर अनुह्य़ा प्रकरणानंतर तर या स्थानकातील प्रवासी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये जाणाऱ्या गाडय़ांतून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना जागा देण्याचे आमिष दाखवून लुटणारे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांविरोधातही याआधी कारवाई झाली आहे. मध्य रेल्वेच्या इतर स्थानकांच्या तुलनेत या स्थानकावरील प्रशासनाची पकडही ढिली आहे. याचाच गैरफायदा घेत लोहमार्ग पोलिसांकडून प्रवाशांची लुबडणूक सुरू होती. प्रवाशांचे मोबाइल तपासण्यापासून त्यांच्याकडील तिकिटे ताब्यात घेण्यापर्यंत विविध मार्गानी हे पोलीस प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे घेत असल्याचे यात दिसत होते. स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात ही बाब ठळकपणे समोर आली. प्रसारमाध्यमांनी हे चित्रीकरण प्रसारित केल्यानंतर खळबळ उडाली होती. याबाबत लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधला असता या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. हे चित्रीकरण नेमके कोणत्या काळात केले होते, याबाबत अद्याप काहीच कळलेले नाही. ते कळल्याशिवाय इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, असेही सांगण्यात आले.