नवी मुंबईतील बिल्डर एस. के. लोहारिया यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी सॅम्युअल अमोलिक याची गुन्हे शाखा नार्को, ब्रेन मॅपिंग तसेच लाय डिटेक्टर चाचणी करणार आहे. अमोलिक आणि तीन आरोपींची बुधवारी पोलीस कोठडी संपत आहे. त्यावेळी न्यायालयापुढे या चाचण्या करण्याची परवानगी गुन्हे शाखा मागणार आह़े
मुंबई गुन्हे शाखा एसके बिल्डरच्या हत्येचा तपास करत आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि माजी पोलीस अधिकारी असलेला अमोलिक तपासात कुठल्याच प्रकारचे सहकार्य करत नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्याची ब्रेन मॅपिंग आणि नार्को चाचणी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अमोलिकने या हत्येची कबुली देत सगळी जबाबदारी स्वत:वर घेतली आहे. परंतु पोलिसांना यामागे खरा सूत्रधार वेगळाच असल्याचा संशय आहे.
या प्रकरणातील फरार आरोपी बिल्डर बिजलानी याच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रियाही लवकरच सुरू केली जाणार आहे. बिजलानीचा अटकपूर्व जामीन सोमवारी न्यायालयाने फेटाळल्यानंतर तो फरारी झाला आहे.